Mumbai-Goa Highway : गणेशभक्तांसाठी महत्त्वाची बातमी..! मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीत मोठे बदल

Mumbai-Goa Highway : गणेशोत्सव निमित्त मुंबईतून कोकणात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रायगड जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर (NH 66) वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर व सुरक्षित व्हावा यासाठी 23 ऑगस्ट 2025 पासून अवजड वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागणार नाही.
अवजड वाहनांवरील बंदीचे वेळापत्रक
रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 टन व त्यापेक्षा जास्त वजनाच्या अवजड वाहनांना खालील कालावधीत मुंबई-गोवा महामार्गावर बंदी असेल. तसेच अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग म्हणून पुणे-सातारा-कराड-कोल्हापूर मार्गे कोकणात जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
– 23 ऑगस्ट 2025, सायंकाळी 6:00 ते 29 ऑगस्ट 2025, रात्री 12:00
– 2 सप्टेंबर 2025, सकाळी 8:00 ते 4 सप्टेंबर 2025, रात्री 8:00
– 6 सप्टेंबर 2025, सकाळी 8:00 ते 8 सप्टेंबर 2025, रात्री 8:00
या कालावधीत ट्रक, ट्रेलर, कंटेनर यांसारख्या अवजड वाहनांना बंदी असेल. तथापि, रुग्णवाहिका, रेशनिंग साहित्य वाहणारी वाहने, दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, वैद्यकीय ऑक्सिजन, धान्य, भाजीपाला आणि नाशवंत वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना या बंदीतून सूट देण्यात आली आहे.
मुंबई-गोवा महामार्ग सुस्थितीत होण्याची ग्वाही
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त आणि सुस्थितीत आणण्याची ग्वाही दिली आहे. त्यांनी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत महामार्गाची पाहणी केली, ज्यात पनवेल येथील पळस्पे जंक्शन, पेण, खारेदी आणि कोलेटी येथील कामांचा आढावा घेतला. त्यांच्यासोबत आमदार प्रशांत ठाकूर, महेश बलदी, रवींद्र पाटील, जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलिस अधीक्षक अंचल दलाल आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
महामार्गावरील खड्डे भरण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून, इंदापूर आणि माणगाव बायपास पूलांचे काम नवीन कंत्राटदारांना देण्यात आले आहे. हे काम वर्षभरात पूर्ण होईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. याशिवाय, खोपोली-पाली रस्त्याची दुरुस्ती, वडखळ-अलिबाग रस्त्याची सुधारणा आणि वाहतूक व्यवस्थेसाठी साइनबोर्ड, सिग्नल आणि रिफ्लेक्टर बसवण्याचे निर्देशही मंत्र्यांनी दिले.
गणेशोत्सवासाठी अतिरिक्त बस सेवा
कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने सुमारे 3,000 अतिरिक्त बस सेवांचे नियोजन केले आहे. यामुळे गणेशभक्तांना गावी जाण्यासाठी परिवहनाची सोय उपलब्ध होईल. तसेच, मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-बेंगलोर महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या सर्व टोल नाक्यांवर गणेशभक्तांसाठी टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे.





