Mumbai – Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर लग्झरी बसने घेतला पेट

पनवेल : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास म्हणजे साक्षात खड्ड्यांतून प्रवास असतो. 18 वर्षांपासून महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम अपूर्ण असल्याने तळकोकणात जाणारे प्रवासी मुंबई-गोवा महामार्गाऐवजी एक्स्प्रेस वेमार्गे पुणे-कोल्हापूर कोकणात जातात. मात्र, ज्यांना चिपळूण, रत्नागिरीला जायचे असते त्यांना महामार्गावरील खड्ड्यांचे दिव्य पार करण्यावाचून पर्याच नसतो. असे असताना या महामार्गावर शनिवारी मध्यरात्रीनंतर मोठी दुर्घटना घडली.
चालकाने तत्परता दाखवल्याने तब्बल 45 प्रवासांचे जीव वाचले. गणपती उत्सवासाठी कोकणवासीय कोकणात जाऊ लागले आहेत. शुक्रवारपासून (22 ऑगस्ट) कोकणवासीयांच्या गाड्या फुल्ल झाल्या आहेत. अशातच कोकणात जाणाऱ्या एक लग्झरी बसला मुंबई-गोवा महामार्गावर आग लागली. मध्यरात्रीनंतर म्हणजे रविवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास पोलादपूरच्या पुढे कशेडी बोगद्याच्या सुरुवातीलाच ही दुर्घटना घडली.
या बसमध्ये 45 होते, असे सांगण्यात आले. ही लग्झरी बस कशेडी बोगद्यात शिरण्यापूर्वी टायरचा मोठा आवाज आला आणि प्रवाशांना काही कळण्यापूर्वीच बस पेटली. आगीच्या ज्वाळा उसळल्या. काही क्षणांतच आगीने संपूर्ण बसला वेढा घातला. प्रवाशांचा आरडाओरड सुरू झाला. मात्र, लग्झरी बसचालकाने प्रसंगावधान दाखवले. बस तत्परतेने बाजूला उभी केली आणि सर्व प्रवाशांना अत्यंत काळजीपूर्वक बाहेर काढले.





