Accident News : शिमगोत्सव (गुढीपाडवा) सणाच्या निमित्ताने कोकणात मोठ्या प्रमाणात चाकरमाण्यांची ये-जा सुरू असताना मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघाताची (Accident News) दुर्दैवी घटना घडली आहे. खेड तालुक्यातील कशेडी बोगदा परिसरात मारुती स्विफ्ट कारचा चालकावरील ताबा सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात एक जणाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना दुपारच्या सुमारास घडली. मुंबईहून कोकणाच्या दिशेने निघालेली मारुती स्विफ्ट कार कशेडी बोगद्याजवळ पोहोचली असता अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. परिणामी, कार रस्त्याच्या कडेला जोरात आदळली. अपघात इतका भीषण होता की, कारचा समोरील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला असून इंजिन फुटले आहे. Accident News या अपघातात वाहनातील दोघे जण गंभीर जखमी झाले. त्यापैकी एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे. उर्वरित जखमी व्यक्तीला तात्काळ खेड येथील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी त्वरित मदतकार्य सुरू केले. स्वामी नरेंद्र महाराज संस्थान यांच्या रुग्णवाहिकेने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात पोहोचवले. पोलिसांनी या अपघाताची नोंद घेतली असून नेमके कारण, वेग, चालकाची स्थिती यासह तपास सुरू केला आहे. अधिक माहिती येताच अपघाताचे कारण स्पष्ट होईल, अशी अपेक्षा आहे. या घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.