काँग्रेसला मोठा धक्का! किरणकुमार रेड्डी यांचा काँग्रेसला रामराम; भाजपमध्ये केला प्रवेश

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी काँग्रेसला अखेर रामराम ठोकला आहे. त्यांनी पक्ष सोडत भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे सांगण्यात येत आहे. जनतेचे म्हणणे काँग्रेसला कळत नाही. चूक काय आहे याचे विश्लेषण करण्याची आणि दुरुस्तीची तयारी नाही. आपणच बरोबर, जनतेसह सर्व जण चूक या काँग्रेसच्या भूमिकेला कंटाळून पक्षत्यागाचा निर्णय घेतल्याचे किरणकुमार रेड्डी यांनी म्हटले आहे.
आंध्रच्या विभाजनापूर्वी ते शेवटचे मुख्यमंत्री होते. कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी यांचे पुत्र अनिल यांच्या नंतर काही तासांत रेड्डी यांनी चे भाजपमध्ये दाखल होणे हा काँग्रेसला दुसरा धक्का मानला जात आहे. आंध्रच्या विभाजनानंतर रेड्डी यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. ‘जय समैक्यआंध्र” हा राजकीय पक्ष त्यांनी स्थापन केला होता.
२०१८ मध्ये ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले होते. मात्र, केंद्रीय नेतृत्वावर नाराज असलेले रेड्डी आंध्र प्रदेशात राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेपासून अंतर राखून होते. त्यानंतर मागील महिन्यांत १२ मार्चला त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे राजीनामा पाठवून दिला होता. तेव्हापासूनच ते भाजपच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात होते.
भाजप मुख्यालयात रेड्डी यांनी संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी आणि सरचिटणीस अरुण सिंह यांच्या उपस्थितीत नव्या पक्षात प्रवेश केला. जोशी यांनी रेड्डी यांना भाजपचे औपचारिक सदस्यत्व दिले. रेड्डी यांनी भाजप प्रवेशासाठी पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले.





