Big Accident: ट्रॅक्टरची ट्राॅली नदीत कोसळून भीषण अपघात; 11 ठार, 21 जणांची प्रकृती गंभीर

शहाजहानपूर – बिरसिंहपूर गावाजवळील नदीकाठच्या पुलावरून ट्रॅक्टर-ट्रॉली कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत 8 मुलांसह 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 24 जण जखमी झाले असून यातील 21 जणांची प्रकृती गंभीर आहे.
अजमतपूर गावातील नागरिक “भागवत कथा’साठी पाणी आणण्यासाठी शनिवारी जात असताना हा अपघात झाला. तिल्हार-निगोही मार्गावरील बिरसिंहपूर गावाजवळील नदीकाठच्या पुलावरून वाहन थेट खाली कोसळले. यात 8 मुले आणि 2 महिलांचा जागीच मृत्यू, तर 24 जण जखमी झाले आहेत.
यातील 21 जण गंभीर असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक (ग्रामीण) संजीव बाजपेयी यांनी दिली. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक एस. आनंद यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना तातडीने 2 लाख रुपये आणि गंभीर जखमींना 50,000 रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.





