लिंग बदलून मुलीचा मुलगा झालेला शरद बनला बाप; पत्नीने दिला मुलाला जन्म

लखनौ: उत्तर प्रदेशातील शहाजहापूरमध्ये शरद सिंह यांच्या कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे. शरद सिंह यांच्या पत्नी सविता यांनी एका खासगी रुग्णालयात मुलाला जन्म दिला आहे. शरद सिंह हे स्वातंत्र्य सैनिक आणि काकोरी कटातील क्रांतिकारी रोशन सिंह यांचे पणतू आहेत. दोन वर्षांपूर्वी लिंग बदलाची शस्त्रक्रिया करून सरिता सिंह यांनी शरद सिंह अशी नवी ओळख स्वीकारली होती.
2021-22 मध्ये सुरू झाला लिंग बदलाचा प्रवास –
इंडिया टुडेच्या माहितीनुसार, शरद सिंह यांनी 2021-22 मध्ये लिंग बदलाची प्रक्रिया सुरू केली होती. मुलगी म्हणून जन्माला आलेल्या शरद यांचे हावभाव, ड्रेसिंग सेन्स आणि केशरचना यामुळे ते मुलांसारखे वाटायचे. या स्थितीला ‘जेंडर डिस्फोरिया’ म्हणतात. शरद यांना नेहमीच स्वतःला मुलगा असल्याचे जाणवायचे. त्यामुळे 2022 मध्ये त्यांनी लखनौमध्ये हार्मोन थेरपी घेतली, ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर दाढी वाढली आणि आवाज जड झाला. त्यानंतर 2023 च्या सुरुवातीला मध्य प्रदेशातील इंदूर येथे शस्त्रक्रिया करून त्यांनी लिंग बदल पूर्ण केला. शहाजहांपूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी उमेश प्रताप सिंह यांनी त्यांना पुरुषत्वाचे प्रमाणपत्र दिले आणि शरद सिंह ही नवी ओळख त्यांना मिळाली.
लग्नानंतर मुलाचा जन्म –
लिंग बदलाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, शरद यांनी 23 नोव्हेंबर 2023 रोजी पिलीभीत येथील मैत्रीण सविता सिंह यांच्याशी लग्न केले. 2 एप्रिल 2025 रोजी सविता यांना प्रसूती वेदना सुरू झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे संध्याकाळी त्यांनी मुलाला जन्म दिला.
“26 वर्षांनंतर मुलगा झाला, हा सर्वात मोठा आनंद” –
बाप बनल्यानंतर शरद सिंह यांनी आनंद व्यक्त करताना सांगितले, “माझ्या कुटुंबात 26 वर्षांनंतर मुलाचा जन्म झाला आहे. प्रत्येकाला मूल होण्याचा आनंद मिळावा अशी इच्छा असते. माझ्या परिस्थितीतून मला हा आनंद मिळाला, हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण आहे.” शरद हे शहाजहांपूर जिल्ह्यातील नवादा दारोबस्त गावचे रहिवासी असून, जवळच्या प्राथमिक शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शरद सिंह यांच्या या अनोख्या प्रवासाने आणि कुटुंबातील नव्या पाहुण्याच्या आगमनाने सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.





