नवी दिल्ली – गुजरातमधील जुनागडमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. दरम्यान, गुजरातमधील जुनागडमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. एक दुमजली इमारत कोसळली असून त्यात ४ लोक गाडले गेल्याचे सांगण्यात येत आहे.
जुनागढच्या दातार रोडवर ही दुर्घटना घडली. येथे एक जीर्ण घर कोसळले असून त्यात 4 लोक गाडले गेले आहेत. या घराखाली भाजीची देखील दुकाने होती. सध्या घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. घटनास्थळी उपस्थित असलेले पथक ढिगाऱ्याखाली दबलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे.
मुसळधार पावसात वाहने आणि जनावरे वाहून गेली
गुजरातमध्ये गेल्या 24 तासांत झालेल्या मुसळधार पावसाने सौराष्ट्र, दक्षिण गुजरात तसेच मध्य गुजरातमध्ये मोठे नुकसान केले आहे. जुनागडमध्ये शनिवारी 15 इंच, तर नवसारीत 13 इंच पाऊस झाला. जुनागडमध्ये तर वाहने आणि जनावरेही वाहून गेली. राज्यातील दोन राष्ट्रीय महामार्ग आणि 10 राज्य महामार्गही बंद करण्यात आले आहेत.
यापूर्वी जुनागडमधील परिस्थितीमुळे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना राजकोटमधील सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करावे लागले होते. तिथून सुमारे 3,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. जुनागढ, वलसाड, गीर सोमनाथ, पोरबंदर आदी जिल्ह्यातील धरणे भरली आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या नऊ टीम सर्वाधिक बाधित ठिकाणी पाठवण्यात आल्या आहेत.