बर्लिनमध्ये मोठी दुर्घटना! जगातील सर्वात मोठे दंडगोलाकार मत्स्यालय फुटले; तब्बल दीड हजार मासे रस्त्यावर….

बर्लिन : बर्लिनमध्ये मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. त्याठिकाणच्या मध्य भागात असलेले एक मोठे मत्स्यालय फुटल्यामुळे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या दुर्घटनेमुळे इथले पर्यटकांसाठी असणारे एक आकर्षण स्थळ नष्ट झाले आहे.
बर्लिनमधील हे मत्स्यालय जगातील सर्वात मोठे दंडगोलाकार मत्स्यालय होते. यातून एक दशलक्ष लिटर पाण्याचा लोट बाहेर पडल्याने संबंधित इमारतीचेही नुकसान झाले. दोन जण किरकोळ जखमी झाल्याचे जर्मन पोलिसांनी शुक्रवारी सांगितले.
त्यात ८० वेगवेगळय़ा प्रजातींचे एक हजार पाचशे उष्णकटिबंधीय मासे होते. २०२० मध्ये त्याचे आधुनिकीकरण केले होते. हे मत्स्यालय बर्लिनमधील पर्यटनस्थळ होते. या मत्स्यालयातून दहा मिनिटांची ‘लिफ्ट राईड’ हे प्रमुख आकर्षण होते.
स्थानिक वेळेनुसार सकाळी सहाच्या सुमारास हे २५ मीटर (८२ फूट) उंच दंडगोलाकार मत्स्यालय फुटले. हे मत्स्यालय ज्या इमारतीत आहे, तेथे हॉटेल व कॅफेही आहेत. बर्लिनच्या अग्निशमन विभागाने सांगितले, की या दुर्घटनेत दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली कुणी अडकले आहेत का, याचा श्वानपथकाकडून शोध घेतला गेला. फुटलेल्या काचा व इतर ढिगारा उपसण्यात आला.
रात्रभर उणे १० अंश सेल्सियसपर्यंतच्या गोठणबिंदूखालील तापमानामुळे या मत्स्यालयाच्या काचेला तडा गेला होता. त्यानंतर पाण्याच्या दबावाने ते फुटल्याचा अंदाज आहे. नेमके कारण तपासले जात आहे. परंतु घातपाताच्या घटनेचा कोणताही पुरावा मिळालेला नाही.
या दुर्घटनेची साक्षीदार ग्वेंडोलिन स्झिस्कोविट्झ हिने जर्मन वृत्तवाहिनीला सांगितले की, तिने मोठा आवाज ऐकला. सुरुवातीला बॉम्बस्फोट झाल्याची भीती तिला वाटली मात्र त्यानंतर मत्सालय फुटले आणि सर्वत्र एकच गोंधळ उडाला. सगळीकडे पाणी आणि मासे झाल्याचे त्यांनी सांगितले.





