Bangladesh flood: बांगलादेशातील पुरातील मृतांची संख्या ५९ वर; ५४ लाख लोकांना पुराचा फटका

Bangladesh flood : बांगलादेशातील पुरामध्ये मरण पावणाऱ्यांची संख्या आता वाढून ५९ झाली आहे. यामध्ये ६ महिला आणि १२ मुलांचाही समावेश आहे. बांगलादेशातील पुराचा फटका ११ जिल्ह्यातील तब्बल ५० लाख नागरिकांना बसला आहे, असे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले.
पुरामुळे सर्वाधिक हानी कमिला आणि फेनी जिल्ह्यात झाली आहे. हे दोन्ही जिल्हे भारतातील त्रिपुरा राज्याच्या सीमेला लागून आहेत. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे १४ आणि २३ जणांचा मृत्यू झाला आहे. इशान्येकडील राज्यांमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जीवित आणि मालमत्तेची मोठी हानी झाली आहे.
देशभरातील ७ लाख लोकांना या अतिवृष्टीमुळे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले आहे. तर ४ लाख लोकांना ३ हजार ९२८ शिबिरांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे. जनावरांसाठी देखील ३६ हजार छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत.
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अतिवृष्टी…
बांगलादेशात सुमारे २०० नद्या आहेत. त्या पैकी ५४ नद्या भारतातून बांगलादेशात वाहतात. गेल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे यापैकी मेघना आणि नैऋत्येकडील चत्रोग्राम हिल्स खोऱ्यामध्ये मोठा पूर आला आहे.





