Hong Kong Sixes 2026 : हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर; ‘या’ खेळाडूवर सोपवली कर्णधारपदाची धुरा
क्रिकेट जगतातील सर्वात वेगवान, थरारक आणि अनपेक्षित वळणांनी भरलेल्या 'हाँगकाँग सिक्सेस' स्पर्धेसाठी (Hong Kong Sixes 2026) अखेर रणशिंग फुंकले गेले आहे.

Hong Kong Sixes 2026 : क्रिकेट जगतातील सर्वात वेगवान, थरारक आणि अनपेक्षित वळणांनी भरलेल्या ‘हाँगकाँग सिक्सेस’ स्पर्धेसाठी (Hong Kong Sixes 2026) अखेर रणशिंग फुंकले गेले आहे. अवघ्या ४५ मिनिटांत निकाल लावणारा हा फॉरमॅट प्रत्येक चेंडूवर उत्कंठा वाढवणारा ठरतो.
अशा अत्यंत वेगवान आणि आव्हानात्मक स्पर्धेसाठी (Hong Kong Sixes 2026) भारताने आपला हुकमी एक्का मैदानात उतरवला असून, अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. येत्या ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान पार पडणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी आयपीएल गाजवणाऱ्या मातब्बर खेळाडूंची फौज सज्ज झाली आहे.
या भारतीय ताफ्यात (Hong Kong Sixes 2026) आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा कसलेला अनुभव आणि आक्रमकतेचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. भुवनेश्वर कुमारच्या नेतृत्वाखालील या संघात तुफानी फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेला क्रुणाल पंड्या, सामना फिरवणारा राहुल तेवतिया, आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणारा शशांक सिंह, आक्रमक फलंदाज नितीश राणा, राहुल त्रिपाठी आणि यॉर्कर स्पेशालिस्ट टी. नटराजन यांचा समावेश करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, शशांक सिंहचा अपवाद वगळता उर्वरित सर्व खेळाडूंनी यापूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची निळी जर्सी अंगावर चढवली आहे. मैदानात केवळ सहाच खेळाडू उतरत असल्याने इथे चुकांना कोणतीही जागा नसते, आणि म्हणूनच हा संघ निवडीपासूनच चर्चेचा विषय ठरला आहे.
या स्पर्धेचा इतिहास पाहिला तर भारताने २००५ मध्ये रॉबिन सिंग यांच्या नेतृत्वाखाली एकमेव विजेतेपद पटकावले होते. तब्बल दोन दशकांनंतर भारताला पुन्हा एकदा या करंडकावर नाव कोरण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. गेल्या वर्षी भारताने परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर डकवर्थ-लुईस नियमाने अवघ्या दोन धावांनी मात करत धमाकेदार सुरुवात केली होती, मात्र नंतरच्या सामन्यांत गाडी घसरल्याने भारताचे आव्हान अकाली संपुष्टात आले.
दुसरीकडे, पाकिस्तानने गेल्या हंगामात कुवेतला नमवत विक्रमी सहाव्यांदा विजेतेपद पटकावले होते आणि यंदा ते गतविजेते म्हणून मैदानात उतरत आहेत. त्यामुळे गतवर्षीचा हिशोब चुकता करून तब्बल २१ वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा निर्धार भुवनेश्वरच्या पलटणीने केला आहे.
या फॉरमॅटचे नियमही नेहमीच्या क्रिकेटपेक्षा पूर्णपणे वेगळे आणि चित्तथरारक आहेत. डावात केवळ सहा षटके असतात आणि यष्टिरक्षक वगळता प्रत्येक खेळाडूला गोलंदाजी करावी लागते; यात एका गोलंदाजाला जास्तीत जास्त दोन षटके टाकण्याची परवानगी असते.
फलंदाजाने अर्धशतक ठोकताच त्याला अनिवार्यपणे ‘रिटायर’ व्हावे लागते, तर पाच गडी बाद झाल्यानंतर शेवटचा फलंदाज एकटाच मैदानात झुंज देतो. १२ संघांच्या या स्पर्धेत प्रत्येक सामना बाद फेरीसारखाच रंगणार आहे.
अशा हाय-व्होल्टेज वातावरणात अनुभवी भुवनेश्वरची रणनीती आणि आयपीएलच्या मॅच-विनर्सची ताकद भारताला पुन्हा चॅम्पियन बनवणार का, याकडे अवघ्या क्रिकेट (Hong Kong Sixes 2026) विश्वाचे लक्ष लागले आहेत.






