Bhupen Borah: आसाम काँग्रेसमधील पेच सुटला! भूपेन बोरांनी राजीनामा मागे घेतला; राहुल गांधींच्या हस्तक्षेपानंतर नाट्यमय घडामोडी
Assam Elections 2026: आसाम प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते भूपेन बोरा यांनी आपला राजीनामा मागे घेतल्याचा दावा पक्षाचे प्रदेश प्रभारी भंवर जितेंद्र सिंह यांनी केला आहे.

Bhupen Borah: आसाम विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अंतर्गत कलहामुळे अडचणीत सापडलेल्या काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला. आसाम प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते भूपेन बोरा यांनी आपला राजीनामा मागे घेतल्याचा दावा पक्षाचे प्रदेश प्रभारी भंवर जितेंद्र सिंह यांनी केला आहे. काँग्रेस हायकमांड आणि विशेषतः राहुल गांधी यांनी बोरा यांच्याशी चर्चा केल्यानंतर हे मन वळवण्यात यश आले आहे.
नेमके प्रकरण काय?
सोमवारी सकाळी ८ वाजता भूपेन बोरा यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला होता. पक्षात आपल्याला डावलले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती. २०२१ ते २०२५ या काळात त्यांनी प्रदेशाध्यक्षपद भूषवले होते, मात्र गेल्या वर्षी त्यांच्या जागी गौरव गोगोई यांची नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून बोरा नाराज असल्याची चर्चा होती.
हायकमांडची धावपळ आणि मनधरणी –
प्रियंका गांधी वाड्रा यांच्या आसाम दौऱ्याच्या काही दिवस आधीच हा भूकंप झाल्याने काँग्रेस नेतृत्व सतर्क झाले. राजीनाम्याचे वृत्त समजताच प्रभारी भंवर जितेंद्र सिंह आणि गौरव गोगोई यांनी तातडीने बोरा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.
गौरव गोगोई यांनी माहिती दिली की, राहुल गांधी यांनी स्वतः बोरा यांच्याशी संवाद साधला आहे. “पक्षातील काही गोष्टींमुळे भूपेन बोरा दुखावले गेले असतील, तर आम्ही त्यांची माफी मागतो,” असे भावनिक आवाहनही गोगोई यांनी केले.
“भूपेन बोरा हे आमच्या कुटुंबातील महत्त्वाचे सदस्य आहेत. लोकशाही पक्षात मतभेद असू शकतात, पण आम्ही ते चर्चेने सोडवले आहेत. त्यांनी राजीनामा मागे घेतल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो,” असे जितेंद्र सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
बोरांचे सावध पाऊल –
दुसरीकडे, पक्षाकडून राजीनामा मागे घेतल्याचा दावा केला जात असला तरी, भूपेन बोरा यांनी मात्र सावध पवित्रा घेतला आहे. “मी माझ्या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी हायकमांडकडे थोडा वेळ मागितला आहे,” असे त्यांनी आपल्या घराबाहेर जमलेल्या पत्रकारांना सांगितले. तसेच, इतर दोन-तीन पक्षांनी आपल्याला संपर्क केल्याचेही त्यांनी कबूल केले, परंतु सध्या तरी काँग्रेसमध्येच राहण्याचे संकेत मिळत आहेत.
निवडणुकीपूर्वी काँग्रेसला दिलासा –
आसाममध्ये यंदा विधानसभा निवडणुका होत आहेत. अशा वेळी ३२ वर्षे पक्षाला देणारा एक ज्येष्ठ नेता बाहेर पडणे काँग्रेससाठी मोठा धक्का ठरला असता. मात्र, वरिष्ठ नेतृत्वाच्या हस्तक्षेपामुळे हा पेच तुर्तास सुटल्याचे चित्र असून आसाम काँग्रेसने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.





