Assam Elections 2026: आसाम विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आसाम प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष भूपेन कुमार बोरा यांनी सोमवारी (१६ फेब्रुवारी) पक्षाचा राजीनामा दिला. बोरा यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे आपले त्यागपत्र सोपवले असून, त्यात त्यांनी पक्ष नेतृत्वाकडून होत असलेल्या दुर्लक्षाचा पाढा वाचला आहे. ‘आत्मसन्मानासाठी दिला राजीनामा’ – भूपेन बोरा हे २०२१ ते २०२५ या काळात आसाम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. मात्र, गेल्या वर्षी त्यांच्या जागी गौरव गोगोई यांची नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून बोरा नाराज असल्याचे बोलले जात होते. राजीनामा दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना बोरा म्हणाले की, “मी पक्षासाठी ३२ वर्षे दिली आहेत. १९९४ पासून मी निष्ठेने काम केले. मात्र, सध्या पक्ष नेतृत्वाकडून मला डावलले जात आहे. हा केवळ वैयक्तिक निर्णय नसून पक्षाच्या भवितव्याची काळजी वाटत असल्याने मी हे पाऊल उचलले आहे.” प्रियंका गांधी वाड्रा यांच्या आसाम दौऱ्याच्या काही दिवस आधीच हा राजीनामा आल्याने काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. भाजपमध्ये जाणार का? भूपेन बोरा भाजपमध्ये सामील होणार का? या प्रश्नावर त्यांनी अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. “मला अद्याप कोणत्याही पक्षाकडून अधिकृत प्रस्ताव मिळालेला नाही, पण याचा अर्थ असा नाही की मी राजकारणातून संन्यास घेत आहे,” असे संकेत त्यांनी दिले आहेत. दुसरीकडे, आसामचे मुख्यमंत्री अनेकदा बोरा यांच्या भाजप प्रवेशाबद्दल बोलत असले, तरी बोरा यांनी सध्या तरी हे वृत्त फेटाळून लावले आहे. अखिल गोगोईंची मध्यस्थी – रायजोर दलाचे अध्यक्ष अखिल गोगोई यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “भूपेन बोरा भाजपमध्ये जाणार नाहीत, ही केवळ अफवा आहे. ते आसाममधील भाजपविरोधी आंदोलनाचे सर्वात मोठे नेते आहेत. काँग्रेसने त्यांना योग्य सन्मान देऊन युतीची जबाबदारी सोपवायला हवी होती. युतीच्या चर्चेसाठी त्यांच्यासोबत दुसऱ्या नेत्याची नियुक्ती केल्यामुळे त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच लागली आहे.” दरम्यान, आगामी मार्च-एप्रिलमध्ये आसाम विधानसभेसाठी निवडणूका होण्याची शक्यता आहे. निवडणुकीपूर्वी काँग्रेसची ही मोठी पडझड मानली जात आहे. यामुळे राज्यातील विरोधी पक्षांच्या युतीवर परिणाम होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.