Alandi Indrayani Pollution : महिनाभरात 5 एमएलडीचा एसटीपी प्रकल्प सुरू होणार – नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे
Alandi Indrayani Pollution : आळंदीत 5 एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प महिनाभरात सुरू होणार. इंद्रायणी प्रदूषण रोखण्यासाठी नगरपरिषदेच्या उपाययोजना.

Alandi Indrayani Pollution : इंद्रायणी नदीत सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आळंदी नगरपरिषदेने पावले उचलली आहेत. आळंदीत उभारण्यात येत असलेला 5 एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) महिनाभरात कार्यान्वित होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी दिली. या प्रकल्पामुळे नगरपरिषद हद्दीतील सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतरच ते नदीत सोडले जाणार आहे.
इंद्रायणी घाट परिसरात आयोजित स्वच्छता अभियानादरम्यान कुऱ्हाडे बोलत होते. भविष्यात नवीन सुधारित आराखड्यानुसार आणखी दोन एसटीपी प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे आळंदीत एकूण 15 एमएलडी क्षमतेची सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या स्वच्छता अभियानात नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, उपनगराध्यक्षा सुजाता तापकीर, गटनेते सचिन गिलबिले, नगरसेविका ऋतुजा घुंडरे, पूजा घुंडरे, साक्षी कुऱ्हाडे, चाकण नगरपरिषदेच्या नगरसेविका विजया तोडकर, विजया जाधव, भाजपा शहराध्यक्ष किरण येळवंडे यांच्यासह ग्रामस्थ, नगरपरिषद अधिकारी-कर्मचारी आणि स्वयंसेवक सहभागी झाले होते. सकाळी 8 ते 10 या वेळेत सर्वांनी हातात झाडू, फावडे, टोपली घेऊन घाट परिसरात श्रमदान केले. साचलेला कचरा, वाळू, गाळ तसेच इतर टाकाऊ वस्तू काढून स्वच्छता करण्यात आली. अभियानानंतर परिसर स्वच्छ आणि आकर्षक दिसत होता.
आळंदीतून प्रदूषित पाणी नदीत जाणार नाही –
कुऱ्हाडे म्हणाले की, आळंदीच्या वरील भागातून मैलामिश्रित पाणी इंद्रायणीत येते. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील काही सोसायट्या आणि कंपन्यांकडून सांडपाणी सोडले जात होते. त्यांच्यावर महापालिका आयुक्त रवी लांडगे यांच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे प्रदूषित पाण्याचा प्रवाह काही प्रमाणात कमी झाला आहे. आळंदीत येणाऱ्या भाविकांना इंद्रायणीचे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करता यावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आळंदी शहरातून पुढे कोणतेही प्रदूषित पाणी इंद्रायणीत जाणार नाही, अशी भूमिका नगरपरिषदेने घेतली असल्याचेही कुऱ्हाडे यांनी स्पष्ट केले.
“गेल्या आठ महिन्यांपासून ‘आपले गाव आपली जबाबदारी’ मोहिमेंतर्गत इंद्रायणी घाट परिसरात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त ठेवण्याचा शासनाचा संकल्प आहे. इंद्रायणीत सांडपाणी सोडणाऱ्या गावांसाठी पीएमआरडीएच्या माध्यमातून एसटीपी प्रकल्पांचे टेंडर उघडण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेची प्रक्रियाही सुरू आहे. या कामांना काहीसा वेळ लागणार असला तरी टप्प्याटप्प्याने प्रकल्प पूर्ण केले जातील, आणि इंद्रायणी पूर्णपणे प्रदूषणमुक्त होईल. ग्रामस्थ, वारकरी आणि भाविकांनीही स्वयंशिस्त पाळावी, इंद्रायणी नदीत निर्माल्य, मूर्ती तसेच टाकाऊ वस्तू टाकू नयेत. नदी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी नागरिकांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे.” – माधव खांडेकर, मुख्याधिकारी, आळंदी नगरपरिषद






