Pune District : भोर-वेल्ह्याचा आधारवड हरपला; मान्यवरांकडून अनंतराव थोपटे यांच्या उल्लेखनीय कार्याची आठवण
Pune District : अशा भावना व्यक्त करत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अनंतराव थोपटे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.

खानापूर : भोर-वेल्हा तालुक्याचे भाग्यविधाते अनंतराव थोपटे यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. दुर्गम डोंगरी भागाचा विकास, शिक्षण क्रांती आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद देणारे त्यांचे नेतृत्व होते, अशा भावना व्यक्त करत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अनंतराव थोपटे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.
भोर- वेल्हा तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून लोकनेते अनंतराव थोपटे साहेब यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात होती. भोर-वेल्हा तालुक्याच्या डोंगरी भागातील गरिबी, शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या समस्यांची सखोल जाण असलेले ते लोकनेते होते. ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या नावातच ‘अनंत’ असल्यामुळे त्यांच्या कार्याची व्याप्तीही अनंत होती. तालुक्यातील जनतेने तब्बल ४५ वर्षे साहेबांवर जीवापाड प्रेम केले. हे नातं केवळ राजकारणापुरतं मर्यादित नव्हतं, तर तो जिव्हाळा आणि आपुलकीचा बंध होता. त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना घडविले आणि समाजकारण, राजकारणात पुढे आणले. साहेबांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. त्यांच्या कार्याची आणि विचारांची प्रेरणा पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरत राहील.
– सुषमा विक्रम चव्हाण, पंचायत समिती सदस्य, उत्रोली गण.लोकनेते अनंतराव थोपटे साहेब हे सामान्यांचे असामान्य नेतृत्व होते. ज्यांच्यावर साहेबांची कृपादृष्टी झाली, त्यांच्या जीवनाचे सोने झाले. जसे परिसामध्ये लोखंडाचे सोने करण्याची क्षमता असते, तसेच साहेबांमध्ये सामान्य कुटुंबांतील कार्यकर्त्यांना ताकद देऊन त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याची विलक्षण क्षमता होती. साहेबांच्या आशीर्वादामुळेच आज मी ज्युनिअर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे, तसेच खानापूर गावचा सरपंच होण्याची संधीही मला साहेबांच्या आशीर्वादानेच मिळाली. माझ्यासारख्या असंख्य सामान्य कार्यकर्त्यांना साहेबांची उणीव कायम भासत राहील. थोपटे साहेबांसारखे लोकनेतृत्व पुन्हा होणे नाही.
– प्रा. चंद्रकांत तुकाराम नांगरे, माजी सरपंच, खानापूर.स्वतःच्या शिक्षणासाठी हालअपेष्टा भोगलेल्या असल्यामुळे, थोपटे साहेबांनी दुर्गम डोंगरी भागातील प्रत्येक वाडी-वस्तीवरील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी ‘वस्ती तिथे शाळा’ ही संकल्पना राबवली. त्यांनी भोर-वेल्हा परिसरात अभियांत्रिकी, फार्मसी, डी.एड., बी.एड. महाविद्यालये आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची केंद्रे सुरू करून शिक्षणाच्या वाटा खुल्या केल्या. ते शिक्षणमंत्री असताना डोंगरी भागातील विद्यार्थ्यांसाठी राखीव जागांचे धोरण आणले, ज्यामुळे खेड्यापाड्यातील मुलांना उच्च शिक्षणाची संधी मिळाली.
परिवहनमंत्री असताना खेड्यापाड्यात एसटी बस पोहोचवून त्यांनी ग्रामीण भाग शहरांशी जोडला. तर १९८८ मध्ये दुग्धविकासमंत्री असताना ‘दूध महापूर’ योजना राबवून व ‘महानंद’च्या उभारणीत योगदान देऊन ग्रामीण तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळवून दिला. खेड्यापाड्यांतून दूध संकलित करून मुंबई व दिल्लीसारख्या महानगरांमध्ये पाठविण्याचे कार्य थोपटे साहेबांनी केले.
– भानुदास थोपटे, सामाजिक कार्यकर्ते, खानापूर.
हेही वाचा : Pune District : हवेलीतील ‘त्या’ 12 गावांना पुन्हा दिवसा वीजपुरवठा





