भोर: “आगामी निवडणुकांसाठी तयारीला लागा” : कुलदीप कोंडे; शिवसैनिकांची आढावा बैठक उत्साहात संपन्न

नसरापूर: भोर तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक नसरापूरजवळील शिवरे गावात उत्साही वातावरणात पार पडली. या बैठकीचे आयोजन शिवसेना तालुका संघटक कुलदीप कोंडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. तालुक्यातील सर्व प्रमुख विभागप्रमुख, शाखाप्रमुख, महिला आघाडी, युवा सेना पदाधिकारी आणि शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित होते.
बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक तयारी, जनतेपर्यंत शिवसेनेची विचारधारा पोहोचवणे, व गावपातळीवर पक्षाचे जाळे अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना कुलदीप कोंडे म्हणाले, “आगामी निवडणुका म्हणजे केवळ सत्तेचा संघर्ष नसून विचारधारेचा लढा आहे. शिवसेना ही समाज परिवर्तनाची ताकद आहे. आपण प्रत्येक गावात संघटनात्मक ताकद उभी केली पाहिजे.”
यावेळी कोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचे स्मरण करून दिले. “हे तीन दैवत प्रत्येक शिवसैनिकासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या विचारांवर आधारित कार्यपद्धती अंगीकारूनच आपण स्थानिक प्रश्न सोडवले पाहिजेत आणि जनतेच्या अडचणी समजून घेऊन त्यावर ठोस उपाय सुचवले पाहिजेत,” असे ते म्हणाले.
शिवसेनेची प्रतिमा अधिक मजबूत करण्याचा निर्धार
बैठकीत पक्षाच्या आगामी योजनांचा आढावा घेण्यात आला. युवकांमध्ये जनजागृती, सोशल मीडियाचा प्रभावी वापर आणि प्रत्यक्ष संपर्कातून पक्षाशी नव्या कार्यकर्त्यांना जोडण्यावर भर देण्याचे ठरले. शिवाय आरोग्य शिबिरे, स्वच्छता मोहिमा, वृक्षारोपण व गरजू विद्यार्थ्यांना मदत असे विविध सामाजिक उपक्रम हाती घेऊन शिवसेनेची प्रतिमा अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
“हे कार्य केवळ निवडणुकीपुरते मर्यादित न ठेवता वर्षभर सातत्याने चालू ठेवावे लागेल. गावागावांत शिवसेनेचे अस्तित्व आणि विचार ठामपणे रुजवण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने आपली सामाजिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे,” असे आवाहनही कोंडे यांनी उपस्थितांना केले.
ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन
बैठकीदरम्यान विविध भागांतील स्थानिक समस्या उभारण्यात आल्या. त्यात रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठ्याची समस्या, एसटी सेवा विस्कळीत होणे यांचा समावेश होता. या सर्व समस्या नोंदवून त्यासंदर्भात संघटनेच्या पुढील कार्ययोजनेत ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले. बैठकीच्या शेवटी उपस्थित शिवसैनिकांनी एकजुटीने काम करत आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेचा झेंडा भोर तालुक्यात यशस्वीरीत्या फडकवण्याचा निर्धार केला. या बैठकीत निर्माण झालेल्या उत्साहपूर्ण वातावरणामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, तालुक्यात पक्षाच्या कार्याला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे.





