Bhor Rain Update: भोरमध्ये मुसळधार पावसाने दाणादाण! भाटघर आणि नीरा देवघर धरणांच्या जलसाठ्यात मोठी वाढ
Bhor Rain Update: पश्चिम पट्ट्यात मुसळधार पावसामुळे पळसोशीत शेतकऱ्यांच्या ताली व माती वाहून गेली; तातडीने पंचनामे करण्याची मागणी.

Bhor Rain Update – गेल्या चार दिवसांपासून भोर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. भोर–मांढरदेवी रस्त्यावर गोकवडी येथील पुलावरून दोन फूट पाणी वाहत असल्याने सोमवारी सकाळी तासभर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. तर रविवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे वरंधा घाटात (भोर–महाड रस्ता) चार ठिकाणी मोठ्या दरडी कोसळल्या. रस्ता बंद झाल्यामुळे उंबर्डे परिसरात २७ वाहने आणि अनेक पर्यटक अडकून पडले होते. प्रशासनाकडून दरडी हटवून रस्ता मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
गोकवडी हद्दीतील या पुलाचे काम वनविभागाच्या हरकतीमुळे सध्या बंद आहे. त्यातच मुसळधार पावसामुळे पुलावर पाणी आल्याने वीसगाव खोऱ्याचा संपर्क तुटला होता; मात्र दुपारनंतर पाणी ओसरताच वाहतूक हळूहळू सुरळीत झाली. तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसाचा जोर अधिक आहे. डोंगरावरून आलेले पाणी ओढ्यांमध्ये न मावल्याने वरवडी येथील परिसर जलमय झाला असून, वरवडी पंचक्रोशीचा संपर्क तुटला आहे. वरोडी बुद्रुक व वरोडी डायमुख येथील ओढ्याला आलेल्या पुरामुळे कामगार,
शेतकरी आणि मजुरांना गावात पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.
मुसळधार पाऊस आणि पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे वीसगाव खोऱ्यातील शेतजमीन खरडून गेली आहे. पळसोशी येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील दगडी ताली आणि माती वाहून गेल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचे शासनाने तातडीने पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
भाटघर आणि नीरा देवघर धरणात पाणीसाठा
सततच्या पावसामुळे तालुक्यातील भाटघर व नीरा देवघर धरणांमधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून नीरा नदी दुथडी भरून वाहत आहे. सध्या भाटघर धरणामध्ये ५. ३४ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाला असून धरण २२. ७१ टक्के भरले आहे. धरण क्षेत्रात आजवर २९९ मिमी पावसाची नोंद झाली. तर नीरा देवघर धरणात ४. १३ टीएमसी पाणीसाठा जमा झाला असून धरण ३५. १८ टक्के भरले आहे. नीरा देवघर क्षेत्रात आतापर्यंत ६९३ मिमी पाऊस झाला आहे.
प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे. नदी, नाले, ओढे आणि पाणी साचणाऱ्या सखल व धोकादायक ठिकाणांपासून सुरक्षित अंतर ठेवावे. डोंगराळ किंवा दरडप्रवण क्षेत्रांत राहणाऱ्या नागरिकांनी विशेष दक्षता बाळगावी. पावसाळ्यात विजेचे खांब किंवा वायर तुटून पडण्याचा धोका असतो, अशा वेळी तात्काळ वीज वितरण कंपनीशी संपर्क साधावा. स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे.






