Bhor News : भोरच्या रस्त्यांचा वनवास संपणार? संग्राम थोपटेंच्या मागणीला मंत्री शिवेंद्रसिंहराजेंकडून हिरवा कंदील

प्रभात वृत्तसेवा
भोर – भोर विधानसभेचे माजी आमदार संग्राम थोपटे व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांच्यात रस्त्यांच्या निधीबाबत बैठक झाली. ही बैठक मुंबई येथील मंत्रालयात पार पडली. यावेळी झालेल्या बैठकीत माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भोर विधानसभा मतदार संघातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्यांच्या कामांसाठी निधी उपलब्ध करणेबाबत मागणी केली.यादरम्यान संबंधित विषयावर सविस्तर चर्चा झाली.
यावेळी मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी आश्वासन दिले की, भोर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या तीन तालुक्यातील रस्त्यांची सीआरएफ (केंद्रीय रस्ते) व एचएएम (हायब्रीड अॅन्युईटी मेन्टेनन्स) अंतर्गत कामे प्राधान्याने घेतली जातील व प्रमुख जिल्हा मार्ग व राज्य मार्गाच्या कामांना जास्तीत जास्त निधी दिला जाईल तसेच इतर जिल्हा मार्गांचे प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा वाढवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर येत्या हिवाळी अधिवेशनात काही रस्ते संग्राम थोपटे यांच्याकडून सुचविले जातील त्या रस्त्यांचा विषय अधिवेशनात मांडला जाईल.
या बैठकीला संग्राम थोपटे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे, राष्ट्रीय महामार्ग पुणे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रुती नाईक, दक्षिण विभागातील सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता अनुराधा भंडारे, पुणे विभागाचे उपअभियंता राहुल कुलकर्णी, भोर येथील सार्वजनिक बांधकाम उपअभियंता राजेसाहेब आगळे, शाखा अभियंता योगेश मेटेकर, पुणे जिल्हा परिषदेतील बांधकाम विभाग उपविभागीय अभियंता विकास कुलकर्णी आदीसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.





