प्रभात वृत्तसेवा सारोळा – गोवा राज्यात उत्पादित आणि महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेल्या विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या टोळीचा राज्य उत्पादन शुल्क, सासवड विभागाने पर्दाफाश केला आहे. पुणे-सातारा महामार्गावरील सारोळे (ता. भोर) येथे सापळा रचून केलेल्या या कारवाईत ट्रक, स्कॉर्पिओ आणि मद्यसाठ्यासह एकूण ४३ लाख ५७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने एका ट्रकमधून बेकायदेशीर विदेशी मद्याच्या वाहतुकीसंबंधित गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला गुरुवार (१७ डिसेंबर) रोजी मिळाली होती. या माहितीच्या आधारे सासवड विभागाच्या पथकाने पुणे-सातारा महामार्गावर सारोळे गावच्या हद्दीत पाळत ठेवली. संशयास्पद ट्रक अडवून त्याची झडती घेतली असता, त्यात गोव्यातील बनावट मद्याचा मोठा साठा आढळून आला. ट्रकचालकाची सखोल चौकशी केली असता, हा माल पुणे शहरालगत असलेल्या आंबेगाव बुद्रुक (ता. हवेली) येथे पोहोचवण्यात येणार असल्याचे समजले. उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अत्यंत चाणाक्षपणे कोणतीही शंका येऊ न देता संबंधित ट्रक आंबेगाव येथे नेला. तेथे मद्याचा साठा घेण्यासाठी आलेली एक स्कॉर्पिओ गाडी पथकाच्या जाळ्यात अडकली. पथकाने तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर संबंधित आरोपीच्या राहत्या घराची झडती घेतली असता, तिथेही अतिरिक्त बेकायदेशीर मद्यसाठा मिळून आला.या कारवाईत विभागाने एक सहा चाकी ट्रक, एक स्कॉर्पिओ गाडी, गोव्यात निर्मित विदेशी मद्याचा मोठा साठा असा मुद्देमाल हस्तगत केला.अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना भोर न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन्ही आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही यशस्वी कामगिरी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एस. एस. बरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात दुय्यम निरीक्षक एस. सी. शिंदे, दुय्यम निरीक्षक पी. एम. मोहिते, जवान डी. के. पिलावरे, पी. आर. सुर्यवंशी, महिला जवान मनिषा भोसले, अंकुश कांबळे आणि मोहन गवळी यांचा समावेश होता.