Bhor Crime News: अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; १२ वर्षीय चिमुरडीच्या ‘त्या’ एका युक्तीमुळे टळला मोठा अनर्थ
Bhor Crime News: शाळेतून घरी परतणाऱ्या मुलीला खोटी बतावणी करून घरात ओढले; पीडितेने दाखवलेल्या कमालीच्या धैर्यामुळे सुखरूप बचाव.

Bhor Crime News – महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच, भोर तालुक्यात एका १२ वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची संतापजनक घटना तालुक्यातील एका गावातून समोर आली आहे. मात्र, पीडित मुलीने दाखवलेल्या कमालीच्या समयसूचकतेमुळे आणि हुशारीमुळे ती या प्रसंगातून सुखरूप बचावली. याप्रकरणी भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला शिरवळ येथून अटक केली आहे.
अविनाश रवींद्र गायकवाड (वय ३४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने भोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १२ वर्षीय मुलगी शाळेतून घरी परतत असताना आरोपी अविनाशने ‘तुझे वडील आमच्या घरात बसले आहेत’ अशी खोटी बतावणी करून तिला आपल्या घरात बोलावले. त्यानंतर त्याने मुलीवर बळजबरी करत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.
या अत्यंत कठीण प्रसंगातही मुलीने प्रचंड धीर व हुशारी दाखवली. “मला खूप तहान लागली आहे, मी किचनमधून पाणी पिऊन येते,” अशी बतावणी तिने आरोपीकडे केली. आरोपीचा डोळा चुकवून तिने तत्काळ किचनच्या दरवाजातून बाहेर पळ काढला आणि स्वतःची सुटका करून घेतली. या घटनेची माहिती मिळताच भोर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून शिरवळ परिसरात सापळा रचला आणि आरोपीला बेड्या ठोकल्या.
“आम्ही भोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाळांमध्ये महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकासह भेट देणार आहोत. तेथे विद्यार्थिनींना ‘गुड टच आणि बॅड टच’ याबाबत प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच, अशा प्रकारच्या प्रसंगांना सामोरे जाताना स्वतःचा बचाव कसा करावा, याचेही सविस्तर मार्गदर्शन केले जाईल.”
– निलेश माने, पोलीस निरीक्षक, भोर पोलीस ठाणे.





