Drug Addiction: धक्कादायक वास्तव! व्यसनाधीनतेचे वय घटले; आता अल्पवयीन मुलेही ड्रग्जच्या विळख्यात..वाचा सविस्तर
Drug Addiction: व्यसनासाठी पैशांची चणचण भासू लागल्याने अल्पवयीन मुलांचे पाऊल गुन्हेगारीकडे; शहरात वाहनांची तोडफोड, चोऱ्या आणि मारामारीचे प्रमाण वाढले.

Drug Addiction – पूर्वी व्यसनाकडे वळण्याचे वय २५ ते ३० वर्षे होते, ते आता १३ ते १५ वर्षांवर आले असल्याचे धक्कादायक वास्तव एका अहवालातून समोर आले आहे. शाळकरी मुले देखील गुटखा, सिगारेट, हुक्का, दारु अशा व्यसनांच्या विळख्यात अडकताना दिसत आहेत. एवढेच नव्हे तर काही अल्पवयीन मुले तर गांजासारख्या घातक व्यसनांच्या अधीन होत आहेत. फुगेवाडी येथे अलिकडेच झालेल्या विषारी दारुकांडांमुळे मोठ्या संख्येने नागरिकांनी प्राण गमावले.
यानंतर पोलीस प्रशासनाने आपली भूमिका अधिक कठोर करत अवैध दारु धंद्ये, गांजा आणि व्यसनाच्या वस्तुंच्या वाहतुकीवर देखील पाश आवळण्यास सुरुवात केली. मोठ्या संख्येने गुन्हे दाखल होत असताना यात अल्पवयीन मुले देखील व्यसनाच्या वस्तुंसह सापडली. यामुळे या विषयाचे गांभिर्य अधिकच अधोरेखित झाले आहे. आजचे आधुनिक तंत्रज्ञान आणि बदलती जीवनशैली जितकी प्रगती साधत आहे, तितकीच ती समाजाला एका भयानक गर्तेत ढकलत असल्याचे चित्र समोर येत आहे.
तंबाखू, दारू आणि अंमली पदार्थ (ड्रग्ज) यांनी आपल्या समाजाला, विशेषतः तरुण पिढीला विळखा घातला आहे. व्यसनाधीनतेमुळे वाढणारे मृत्यूचे आकडे पाहता, एका सशक्त आणि सुदृढ राष्ट्राच्या निर्मितीसाठी ‘व्यसनमुक्त समाज’ ही आजच्या काळाची सर्वात मोठी आणि तातडीची गरज बनली आहे. चिंतेची बाब म्हणजे तरुण पिढीचा व्यसनाकडे अधिक कल आहे आणि दुसरे म्हणजे वाढते मृत्यूचे आकडे.
व्यसन म्हणजे मृत्यूची वाट
तंबाखू आणि धूम्रपानामुळे दरवर्षी ८० लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू तंबाखूमुळे होतो. भारतात हा आकडा दरवर्षी लाखोंमध्ये असतो. त्याचबरोबर कर्करोगाच्या (Cancer) एकूण रुग्णांपैकी अंदाजे ५० टक्के रुग्ण हे तंबाखूच्या व्यसनाशी संबंधित असतात. मद्यपानामुळे,अंमली पदारर्थांमुळे जगात मृत्यूचा आकडा वाढत असल्याचे दिसून येते. यात प्रामुख्याने लिव्हर सोरायसिस आणि दारू पिऊन झालेल्या रस्ते अपघातांचा समावेश आहे.
अंदाजे एकूण मृत्यूंपैकी सर्वाधिक मृत्यू तरुणांचे होत आहेत. त्याचबरोबर अंमली पदारर्थांमुळे मृत्यू थेट ड्रग्ज ओव्हरडोज किंवा अंमली पदार्थांशी संबंधित आजारांमुळे होतो. भारतात रासायनिक व सिंथेटिक ड्रग्जच्या सहज उपलब्धतेमुळे ‘ड्रग इंड्युस्ड डेथ्स’ (नशेमुळे होणारे मृत्यू) चा आकडा वेगाने वाढत आहे.
व्यसनातून गुन्हेगारीकडे
अल्पवयीन मुले व्यसनाची पहिली पायरी चढली की कळत-नकळत गुन्हेगारीच्या दुसऱ्या पायरीवरही पाऊल ठेवतात. यात प्रामुख्याने नशेत वाहनांची तोड-फोड करणे, मारामाऱ्या करणे हे प्रकार शहरात अनेकदा घडले आहेत. तसेच व्यसना करण्यासाठी पैसे मिळवणे हे त्यांचे रोजचे काम होते. व्यसन दिवसें-दिवस वाढतच असते आणि त्यासाठी पैसा ही लागतो. पैशांसाठी सुरुवातीला उधारी करणे, नंतर दमदाटी करुन आपल्या परिचितांकडून पैसे मागणे, लहान व्यावसायिकांना धमकावणे, असेही प्रकार सर्रास होतात. काही मुले तर चोरी-वाटमारीच्या मार्गावरही जातात. तर काही जण अंमली पदार्थ वाहतुकीच्या जाळ्यातही अडकतात.




