Bhor Assembly Election 2024 | आता ‘किरण दगडे पॅटर्न’ चालणार – प्रवीण तरडे

भोर (प्रतिनिधी) :- शेतकर्यांवर चित्रपट काढण्यासाठी मदतीला धावलेला पहिला माणूस किरण दगडे आहे. तो केवळ आशेचा नाही तर भविष्याचा किरण आहे. विचार, बांधलकी यापेक्षा काम महत्वाचे आहे. आज याच कामाच्या जोरावर अपक्ष उमेदवाराच्या सभेला झालेली गर्दी पाहून यंदा भोर, राजगड, मुळशी विधानसभेत ‘मुळशी पॅटर्न’च्या यशानंतर ‘किरण दगडे पॅटर्न’ चालणार, असा विश्वास प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे यांनी व्यक्त केला.
भोर विधानसभा मतदारसंघात महायुतीतील भाजपचे माजी नगरसेवक किरण दगडे यांनी अपक्ष उभे राहून आज रायरेश्वराचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडला. त्यानंतर भोर येथे झालेल्या प्रचार सभेत प्रविण तरडे बोलत होते. यावेळी बबनराव दगडे, गोविंद रणपिसे, उमेदवार किरण दगडे यासह भोर, राजगड, मुळशीतील किरण दगडे समर्थक उपस्थित होते.
प्रविण तरडे म्हणाले, अपक्ष उमेदवाराच्या सभेला झालेली गर्दी ही त्या उमेदवाराचे काम पाहून होते. सध्याचा काळ हा अपक्षांचा आहे. किटली चिन्ह हे सर्वसामान्याचे आणि गोडवा देणारे आहे. त्यामुळे आपली व्यक्ती फिक्स, किटली फिक्स आणि कामही फ्रेश असणार. शेतकर्याचा मुलगा असलेला किरण निखळता झरा असून, प्रत्येक शेतकर्याने आपल्या शेताकडे वळवायचा आहे.
“ज्या रायरेश्वरावर आज प्रचाराचा नारळ फोडला ते मंदिर जागतिक तीर्थ क्षेत्र बनवण्याचे माझे स्वप्न असून ते पूर्ण करणार. तसेच तरूणांना तालुक्यातच रोजगार मिळावा यासाठी एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावणार. मुलांसाठी क्रीडा संकुल, मुलींच्या विवाहासाठी आणि महिला बचत गटासाठी मोफत कार्यालय, रस्त्यांचे प्रश्न, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे प्रश्न प्रामुख्याने सोडवले जातील.”
-किरण दगडे (अपक्ष उमेदवार, भोर-राजगड-मुळशी)
किरण दगडे म्हणाले, ही कुटुंबाची सभा असून, आता तुमच्या आशिर्वादाची गरज आहे. तुम्ही माझ्यासाठी एक दिवस द्या, मी तुमच्यासाठी आयुष्यभर असेल. सर्वांना अभिमान वाटेल असे काम करून दाखवेल, असा विश्वास व्यक्त करत दगडे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हिंदवी स्वराज्याची सुरुवात भोर, राजगड याच दोन तालुक्यातून केली. आज या तालुक्यांची काय अवस्था झाली याचा विचार करण्याची वेळ आली आहे.





