पुणे जिल्हा : सर्वांची साथ आणि आशीर्वाद पाहिजे – किरण दगडे

राजगड, भोर तालुक्यात प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद
भोर – निष्ठा आणि परिवर्तनाच्या लढाईमध्ये आपल्या सर्वांची साथ आणि आशीर्वाद पाहिजे. तुमचा एक दिवस माझ्यासाठी द्या, मी आयुष्यभर तुमच्यासोबत असेल, असा विश्वास भोर विधानसभेतील अपक्ष उमेदवार किरण दगडे यांनी नागरिकांना केले.
रायरेश्वरावर प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर पहिल्याच दिवशी किरण दगडे यांनी राजगड तालुक्यात पदायात्रेतून कुटुंबांना भेटी देत संवाद साधला. त्यावेळी महिलांसह ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. औक्षण करण्यासाठी महिलांनी गर्दी केली. तर गावकऱ्यांनी मंदिर परिसरात संवाद बैठकांचे आयोजन केले.
दादा यंदा ‘किटली’तील गोडवा संपूर्ण मतदारसंघात पोहचवायचा आहे. त्यासाठी आमची तुम्हाला साथ आहे, असा विश्वासही पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी दगडे यांना बैठकीत दिला. यावेळी वृध्द व्यक्तींनी दगडे यांनी घडविलेल्या काशी यात्रेचे कौतुक करत, तू आमच्या घरातला सदस्य, तसाच या मतदारसंघाला कुटुंबाप्रमाणे जप, विकास कर असे सांगत शुभेच्छा दिल्या.
एकदा सेवेची संधी द्या भोर विधानसभा मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलून दाखवेल, असा विश्वास दगडे यांनी दिला. गुंजवणे, चिरमोडी, अंबवणे, बोरवळे, कोळवडी, करंजावणे, मार्गसानी, विंझर, लाशिरगांव, दापोडे तर आज (दि. १०) भोर तालुक्यातील भुतोंडे, कुरूंजी, करंदी, वाकांबे, जोगवडी, हर्णस, मळे, डेरे, ब्राह्मणघर, ममाळवाडी आदी गावांना भेटी दिल्या.





