Bhor Assembly Election 2024 | रस्ते, पाणी, शिक्षण आणि आरोग्य सुविधांना प्राधान्य देणार – शंकर मांडेकर

पिंरगुट(प्रतिनिधी) – सर्वसामान्य जनतेचा मी कार्यकर्ता असून तळागाळातील लोकांपर्यंत माझा संपर्क आहे. मतदारसंघातील गावांमध्ये रस्ते, पाणी, शिक्षण आणि आरोग्य सुविधा यांच्याकडे प्राधान्याने लक्ष देणार आहे. मतदारांनी संधी दिल्यास मतदारसंघाला प्रगतीच्या नव्या शिखरावर पोहोचविणार असल्याची ग्वाही भोर-राजगड-मुळशी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शंकर मांडेकर (Shankar Mandekar) यांनी दिली.
भोर-राजगड-मुळशी विधानसभा (Bhor Assembly Election 2024) मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचारार्थ आंधळे (ता. मुळशी) येथे आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. मुळशी तालुक्यातील आंधळे, कातरखडक, खांबोली, पिंपळोली, जवळगाव, केमसेवाडी, पडळघर वाडी, रिहे, घोटावडे, मुलखेड, नांदे, लवळे, सुस, म्हाळुंगे या गावांना मांडेकर यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.
यावेळी मांडेकर यांचे कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. तसेच या भेटीत मतदारसंघातील महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. यावेळी महिलांनी मांडेकर यांचे औक्षण करून स्वागत केले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा महिलांना लाभ मिळत असून त्याबद्दल महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.





