भोर विधानसभेत आरपीआय आठवले गटाचा कौल कोणाला ?

पौड – रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महायुती सोबत घटक पक्ष म्हणून कार्यरत आहे, परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभेत भारतीय जनता पार्टीच्या वतीने एकही जागा देण्यात आली नव्हती तरीही रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पक्षाला साथ देऊन केंद्रात बहुमत मिळवून देण्यास खारीचा वाटा उचलला. (bhor assembly constituency)
विधानसभा निवडणुकीत 288 जागा पैकी एकही जागा महायुतीने रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाला सोडलेली नाही. त्यामुळे पक्षामध्ये नाराजीचा सुर उमटला आहे. महायुतीमधून जागा मिळत नसल्याने पक्षाची फसवणूक करण्यात आल्याचे मत रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट ) पुणे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत कदम, कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, भोर विधानसभा मतदार संघात भोर, मुळशी, राजगड (वेल्हा) या तालुक्यातील रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे मतदान निर्णायक होऊ शकते, त्यामुळे भोर मतदार संघात पक्ष कोणाच्या बाजूने कौल देणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





