Shankar Mandekar: “असा नेता पुन्हा होणे नाही!” आमदार शंकर मांडेकर अजितदादांबद्दल बोलताना भावूक
Shankar Mandekar: ग्रामीण भागातील अडीअडचणी सोडवणारा आणि सर्वसामान्यांशी नाळ जोडणारा नेता म्हणजे अजितदादा; भोरचे आमदार शंकर मांडेकर यांचे प्रतिपादन.

Shankar Mandekar – ग्रामीण भागातील समस्या सोडवून सर्वसामान्यांशी घट्ट नाळ जोडणारा नेता म्हणजे अजितदादा. ग्रामीण भागातील अडीअडचणींकडे त्यांचे नेहमीच विशेष लक्ष असायचे. सकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत ते लोकसेवेच्या कामात व्यस्त असायचे. असा नेता पुन्हा होणे नाही, अशी भावना भोर विधानसभेचे आमदार शंकर मांडेकर यांनी व्यक्त केली.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आणि आमदार शंकर मांडेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना आमदार मांडेकर बोलत होते.
या महाआरोग्य शिबिरात सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या, दंतरोग, महिलांच्या स्तनाच्या कर्करोगाची तपासणी, रेडिएशन थेरपी आणि नेत्रतपासणी मोफत करण्यात आली. तसेच बीपी, शुगर तपासणी व ईसीजी सुविधा देण्यात आली. गरजू रुग्णांना मोफत चष्मे, श्रवणयंत्रे आणि कृत्रिम अवयव उपकरणांचे वाटप करण्यात आले.
या वेळी जिल्हा परिषद पशुसंवर्धन सभापती अमोल नलावडे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जिल्हा परिषद सदस्य विक्रम खुटवड, प्रवीण जगदाळे, भोर पंचायत समितीच्या सभापती मनीषा कंक, उपसभापती विशाल कोंडे, तालुक्यातील आशासेविका व अंगणवाडी सेविका, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
भोरमध्ये लवकरच सुसज्ज सभागृह
आमदार मांडेकर म्हणाले, भोर तालुक्यात दुर्गम भागाचे प्रमाण मोठे असून नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. गंभीर आजारांच्या वेळी त्यांना मोठा संघर्ष करावा लागतो, यासाठीच आरोग्य शिबिरांचे आयोजन गरजेचे आहे. राजकारणासोबत समाजकारण करणे हे आमचे कर्तव्य आहे. आरोग्य शिबिरे व विविध सार्वजनिक कार्यक्रमांसाठी भोरमध्ये लवकरच एक सुसज्ज सभागृह उभारले जाईल.





