Bhopal News : परिक्षेदरम्यान मोबाइलचा वापर; विद्यार्थ्याची आत्महत्या

भोपाळ – मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका विद्यार्थ्याला शाळेत परीक्षेदरम्यान मोबाइल फोन वापरताना पकडण्यात आले. शाळा व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यावर कारवाई करण्यात आली.
या घटनेनंतर विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. विद्यार्थ्याचा मृत्यू गळफास घेतल्यामुळे झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. रात्री कुटुंबीयांनी विद्यार्थ्याला रुग्णालयात नेले.
मात्र, येथील डॉक्टरांनी या विद्यार्थ्याला मृत घोषित केले असून, या घटनेची संपूर्ण माहिती धार जिल्हा पोलिसांनी मंगळवारी दिली. आत्महत्येची ही घटना जिल्हा मुख्यालयापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या उटावद गावात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबीयांनी चौकशीदरम्यान सांगितले की, सोमवारी एका खासगी शाळेतील एका विद्यार्थ्याला परीक्षेदरम्यान मोबाइल फोन वापरताना पकडण्यात आले. कॉल आल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यावर कारवाई केली, त्यामुळे त्याने हे पाऊल उचलले.





