Bhimashankar News: श्रावणी सोमवारसाठी भीमाशंकर सज्ज! दररोज ७० हजार भाविकांच्या दर्शनाचे नियोजन
Bhimashankar News: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे श्रावणी सोमवारनिमित्त जय्यत तयारी; दररोज ७० हजार भाविक येण्याचा देवस्थानचा अंदाज.

Bhimashankar News – श्रावण महिन्याला गुरुवार, दि.१३ पासून सुरुवात होणार असल्याने बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. दररोज अंदाजे सुमारे ६० ते ७० हजार भाविक दर्शनासाठी येतील, असा अंदाज देवस्थान ट्रस्टने व्यक्त केला आहे. भाविकांना सकाळी ५ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार आहे.
पावसामुळे गैरसोय होऊ नये म्हणून आवश्यक ठिकाणी ताडपत्री, तसेच जुने वन संकुल ते बुद्ध विहार मार्गावर बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. भाविकांना एका रांगेतून मुखदर्शन, स्पर्शदर्शन व कळसदर्शन घेता येणार आहे. गर्दी नियंत्रणात असल्यास साधारण अर्धा ते एक तासात दर्शन पूर्ण होईल. मंदिर परिसरात सुरक्षेसाठी सीसीटीव्ही, पायरी मार्गावर स्वच्छतागृहे आणि अतिरिक्त स्वच्छता कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
पोलिसांचा विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, वाहनांसाठी पार्किंग क्रमांक ४, २ व ३ येथे व्यवस्था करण्यात आली आहे. तेथून भाविकांना बसने मंदिर परिसरात आणण्यात येणार आहे. वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी जनित्राची व्यवस्था करण्यात आली असून महावितरणकडून स्वतंत्र वायरमन उपलब्ध करून दिला जाणार आहे.
पुणे, राजगुरुनगर व मंचर आगारातून २० ते २५ एसटी बस, तसेच मंदिर ते पाच क्रमांक वाहनतळासाठी ४० बस उपलब्ध राहणार आहेत.अशी माहिती आगार प्रमुख आरिफ पटेल यांनी दिली.पाऊस व धुक्यामुळे निसर्ग पर्यटनालाही बहर आल्याने भाविकांची गर्दी वाढत आहे.भाविकांच्या सुरक्षित दर्शनासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे पुजारी गोरक्ष कौदरे यांनी सांगितले.
“श्रावण महिन्यात भीमाशंकर येथे येणाऱ्या भाविकांना सुरक्षित व सुलभ दर्शन मिळावे, यासाठी पार्किंग, वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता, वीज व दर्शन व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे.भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.”
– सुरेश कौदरे,अध्यक्ष भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट.





