भिडे पूल पुन्हा पाण्याखाली, वाहतूक बंद

पुणे : खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, टेमघर, पानशेत, वरसगाव ही चार धरणे शंभर टक्के भरल्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री पुन्हा धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्यानंतर नदीपात्रातील रस्ता तसेच भिडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.
भिडे पूल पाण्याखाली गेल्यानंतर डेक्कन भागातील कोंडी टाळण्यासाठी डेक्कन भागातील संभाजी पूल दुचाकी वाहनांसाठी खुला करून देण्यात आला आहे. शुक्रवारी मध्यरात्री धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून नदीपात्रातील रस्ता तसेच भिडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला, अशी माहिती डेक्कन वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी दिली.
नदीपात्रातील रस्त्याचा वापर डेक्कन, कोथरूड, एरंडवणे तसेच मध्यभागात येणाऱ्या दुचाकीस्वार मोठ्या प्रमाणावर करतात. नदीपात्रातील रस्ता बंद केल्यानंतर मध्यभागातील नारायण पेठ, शनिवार पेठेतील रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत होते. त्यामुळे या भागातील छोट्या रस्त्यावर कोंडी होते.
महापालिका भवन ते शनिवार पेठ दरम्यान असलेल्या टिळक पुल शुक्रवारपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. शनिवार पेठेतून शिवाजीनगर भागात जाणारे वाहनचालक या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. खडकवासला धरण साखळीत पावसाचा जोर ओसरला असून धरणातून सोडण्यात येणारे पाणी टप्याटप्याने कमी करण्यात आले होते. त्यामुळे शुक्रवारी सकाळी नदीपात्रातील रस्ता, भिडे पूल वाहतुकीसाठी खुला करून देण्यात आला होता.





