अतिशय भावनिक क्षण….! घरकाम करणाऱ्या मुलीच्या लग्नातर भास्कर जाधवांना अश्रू अनावर

Bhaskar Jadhav Emotional : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि गुहागर मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव रोखठोक आणि आक्रमक राजकारणी म्हणून ओळखले जातात. मात्र या आक्रमक भास्करावांमध्ये एक हळवा माणूसही दडला आहे. याची प्रचिती त्यांचा एका व्हायरल व्हिडीओमधून आली आहे. गुहागर तालुक्यातील पांगारी गावातील सुप्रिया पाटील ही मुलगी आमदार भास्कर जाधव यांच्या घरी गेल्या आठ वर्षांपासून कामाला होती.
आपला मनमिळावू स्वभाव आणि प्रामाणिकपणामुळे तिने जाधव कुटुंबातील सर्वांचेच मन जिंकले आहेत. विशेष म्हणजे आमदार भास्कर जाधव यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनीसुद्धा तिला स्वतःच्या मुलीप्रमाणेच प्रेम दिले. त्यामुळे तिचे लग्न ठरल्यानंतर मुलीप्रमाणेच सर्व काही करून तिला तिच्या घरी पाठवले होते. लेकीची पाठवणी करताना बापमाणूस जसा डोळ्यातून पाणी काढतो, तसेच अश्रू या मानलेल्या लेकीची पाठवणी करताना भास्कर जाधवांच्या डोळ्यातून आले.
अन् भास्कर जाधवांच्यात दडलेला बापमाणूस झाला जागा
आमदार भास्कर जाधव यांच्याकडे घरकाम करणाऱ्या सुप्रियाचे आज लग्न होते. त्यासाठी जाधव यांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम बाजूला ठेवून पत्नी, मुले, पुतणे, सुनांसह लहानशा पांगारी गावातील सडेवाडीमध्ये लग्नाच्या मुहूर्तावर पोहोचले. लग्न लागलं.. सात फेरे झाले. लग्न लागल्यानंतर निरोपाची वेळ आली. त्यानंतर जाधव कुटुंब जेव्हा तिला भेटायला गेले तेव्हा भास्करराव जाधव यांचा कंठ दाटून आला.
सुप्रियाने पत्नी सौ. सुवर्णाताई आणि सून सौ. स्वरा यांना कडकडून मिठी मारली आणि ती रडू लागली. आपुलीच्या नात्यांमधून तयार झालेल्या या प्रेमाचा हळवा क्षण पाहताना उपस्थितांचेही डोळे पाणावले. तेव्हा, सुप्रियाला बापाचं प्रेम देणाऱ्या भास्कर जाधवांच्याही अश्रूंचा बांध फुटला. डोळ्यातील रुमाल काढत त्यांनी आपले अश्रू पुसले.
तसेच, स्वतःला सावरत त्यांनी मुलाला आणि तिच्या सासरच्या मंडळींना बापाच्या नात्याने सांगितले की, ‘सुप्रिया ही माझ्या मुलीसारखी नव्हे तर माझी मुलगीच आहे. ती लक्ष्मी आहे, तुमच्या घराची ती नक्कीच भरभराट करेल. त्यामुळे तुम्हीसुद्धा तिला मुलीप्रमाणे प्रेम द्या.’ असा भावुक सल्ला पाठ परतविणीच्यावेळी भासकर जाधव यांनी दिला.





