Bharat Jodo Yatra : विधानसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’ होणार सुरु

Bharat Jodo Yatra : मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममधील विधानसभा निवडणुका आणि पुढील वर्षी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेस पक्ष जोरदार प्रयत्न करत आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यासाठी भारत जोडो यात्रा सुरू केली होती आणि त्याचा फायदा पक्षाला कर्नाटक निवडणुकीत मिळाला. आता अशी माहिती समोर येत आहे की, राहुल गांधी लवकरच भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरू करू शकतात.
काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी त्यांच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरू करू शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान आयोजित केला जाऊ शकतो. याआधी मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी १३ नोव्हेंबरला भोपाळमध्ये पदयात्रा काढणार आहेत. सध्या राहुल गांधी तीन दिवसांच्या उत्तराखंड दौऱ्यावर असून त्यांनी बाबा केदारनाथचे दर्शन घेतले.
मध्य प्रदेशात राहुल गांधींचे धमाकेदार कार्यक्रम
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासंदर्भात राहुल गांधींच्या आगामी कार्यक्रमांबद्दल बोलायचे झाले तर, उद्या म्हणजेच बुधवारी (८ नोव्हेंबर) ते छत्तीसगडमधील अंबिकापूर येथे असतील. यानंतर 9 नोव्हेंबरला मध्य प्रदेशातील जबलपूर, 10 नोव्हेंबरला सतना आणि 13 नोव्हेंबरला भोपाळमध्ये कार्यक्रम आहे.
यावेळचा प्रवास मागील भारत जोडो यात्रेपेक्षा वेगळा असेल का ?
यापूर्वी राहुल गांधी यांनी 7 सप्टेंबर 2022 रोजी कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रा सुरू केली होती, आणि 30 जानेवारी 2023 रोजी जम्मू-काश्मीरमधून ती संपवली होती. भारत जोडो यात्रा 2.0 या वर्षी डिसेंबर महिन्यापासून सुरू होऊ शकते आणि पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत चालेल. हा प्रवास मागील प्रवासापेक्षा वेगळा असेल असेही बोलले जात आहे. मागच्या वेळी राहुल गांधींनी पायी प्रवास केला होता, तर यावेळी कुठेतरी पायी तर कुठे वाहनातून प्रवास पूर्ण होणार आहे.





