सावधान.! साखर आणि मीठातही प्लास्टिकचा आढळ; नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी होणार

चेन्नई – नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात असा खळबळजनक दावा करण्यात आला आहे की, प्लॅस्टिकचे अत्यंत सूक्ष्म कण साखर आणि मीठ यांसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तूंमधून आपल्या शरीरात पोहोचत आहेत.
प्लॅस्टिकच्या या अत्यंत चिमुकल्या कणांमुळे इतर अनेक गंभीर आजारांसोबतच मानवाला कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराची लागण होण्याची भीती होती. आता खाद्यपदार्थांवर आवश्यक नियम बनवणारी संस्था एफएसएसआय या दाव्यांची गांभीर्याने चौकशी करेल.
मानवी रक्त मज्जा आणि श्वसन प्रणालीपर्यंत प्लास्टिक पोहोचत असल्याच्या दाव्यांचा तपास करण्यासाठी, एफएसएसआय ने या अभ्यासासाठी देशातील तीन नामांकित प्रयोगशाळांचा समावेश केला आहे. अभ्यासाच्या निष्कर्षांवर आधारित, खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंग आणि वाहतुकीबाबत सरकारकडून नवीन मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली जाऊ शकतात.
खरं तर, अन्न आणि कृषी संघटनेने (एफएओ) आपल्या अहवालात दावा केला होता की उत्पादनापासून वापरापर्यंतच्या प्रक्रियेत अन्नपदार्थ अनेकदा प्लास्टिकमध्ये पॅक केले जातात.
विविध कंपन्यांचे तयार केलेले खाद्यपदार्थ लोकांपर्यंत पोहोचवले जात असताना प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये खाद्यपदार्थ आणि पिण्याच्या पाण्याचे पॅकेजिंग असल्याने प्लास्टिकचे अत्यंत सूक्ष्म कण लोकांच्या पोटात जात असल्याची भीती व्यक्त होत होती.
हे प्लास्टिकचे कण लोकांच्या आतडे, रक्त आणि अस्थिमज्जा यांसारख्या अवयवांपर्यंत पोहोचल्याची भीती या क्षेत्राशी निगडित तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. लोकांमध्ये कॅन्सरसारखे आजार अचानक वाढण्यामागे हे एक प्रमुख कारण म्हणूनही पाहिले जात आहे.





