Pune District : सुट्या मिठाईवरील बेस्ट बिफोरची तारीख गायब
Pune District : विशेषतः दूध, खवा, मावा आणि मलईपासून तयार होणारे पदार्थ योग्य तापमानात न ठेवल्यास त्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असते.

आळेफाटा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आळेफाटा परिसरातील मिठाईच्या दुकानांमध्ये मोदक, पेढे, लाडू, बर्फी यांसह विविध मिठाईची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. मात्र, सुट्या स्वरूपात विकल्या जाणार्या मिठाईवर उत्पादनाची तारीख अथवा ‘बेस्ट बिफोर’ची माहिती स्पष्टपणे उपलब्ध नसल्याने ग्राहकांना पदार्थाची ताजेपणा आणि सुरक्षिततेबाबत खात्री करणे कठीण जात आहे.
मिठाई किती दिवसांपूर्वी तयार केली, अशी विचारणा केल्यावर काही विक्रेत्यांकडून ‘आजच बनवली आहे’, असे तोंडी सांगितले जाते. मात्र, पदार्थ नेमका कधी तयार झाला आणि तो कोणत्या परिस्थितीत साठवला गेला, याची माहिती ग्राहकांना मिळत नसल्याची तक्रार आहे. गणेशोत्सव, धार्मिक कार्यक्रम आणि घरगुती समारंभांमुळे या काळात मिठाईची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. विशेषतः दूध, खवा, मावा आणि मलईपासून तयार होणारे पदार्थ योग्य तापमानात न ठेवल्यास त्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे मिठाईच्या दुकानांमध्ये स्वच्छता, साठवणूक आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन होते का, याची तपासणी करण्याची मागणी होत आहे.
सणासुदीच्या काळात उत्पादक, घाऊक विक्रेते आणि किरकोळ विक्रेत्यांमार्फत मोठ्या प्रमाणात मिठाई बाजारात येते. या प्रक्रियेत वाहतूक आणि साठवणुकीदरम्यान योग्य तापमान राखले जाते का, याचीही तपासणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने आळेफाटा परिसरातील मिठाई दुकाने, खवा-मावा विक्रेते तसेच मिठाईच्या पुरवठा साखळीची तपासणी करावी, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे. सणापुरती कारवाई न करता नियमित तपासणी आणि जनजागृती करण्याची गरजही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
‘ताजी मिठाई’ एवढेच सांगण्यापेक्षा पदार्थ कधी तयार झाला, त्याची साठवणूक कशी करण्यात आली आणि वापरासाठी तो किती काळ योग्य आहे, याबाबत ग्राहकांना स्पष्ट माहिती मिळणे आवश्यक आहे. मिठाई खरेदी करताना ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित ही बाब गांभीर्याने घेऊन संबंधित यंत्रणेने तपासणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





