बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरण: मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव बडतर्फ, पोलिस अधिकारी निलंबित

बेंगळुरू: चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर 4 जून 2025 रोजी रॉयल चैलेंजर्स बेंगळुरू (RCB) च्या IPL विजयाच्या जल्लोषादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारने मोठी कारवाई केली आहे. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू आणि 56 जण जखमी झाले.
मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी गुरुवारी बेंगलुरूचे पोलिस आयुक्त बी. दयानंद, केंद्रीय विभागाचे डीसीपी शेखर एच. टेककन्नावर, स्टेडियम प्रभारी अतिरिक्त पोलिस आयुक्त विकास कुमार, सहायक पोलिस आयुक्त सी. बालकृष्ण आणि कब्बन पार्क पोलिस ठाण्याचे निरीक्षक एके गिरीश यांना तात्काळ निलंबित केले. शुक्रवारी, मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव के. गोविंदराज यांना बडतर्फ करण्यात आले, तसेच माहिती विभागाचे प्रमुख हेमंत निंबालकर यांची बदली करण्यात आली.
या प्रकरणी RCB आणि डीएनए एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या चार अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली, ज्यात RCB चे मार्केटिंग प्रमुख निखिल सोसले, डीएनएचे सुनील मैथ्यू आणि किरण कुमार यांचा समावेश आहे. ही कारवाई बेंगलुरू पोलिस आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त मोहिमेद्वारे करण्यात आली. पोलिस आयुक्त सीमांत कुमार सिंह यांनी सांगितले की, हे प्रकरण गुन्हे तपास विभागाकडे (CID) सोपवण्यात येणार आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेत 10 जून रोजी पुढील सुनावणीसाठी सरकारला अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.





