Virat Kohli : ‘आयुष्यात काहीही तुम्हाला…’, विराट कोहलीचं बंगळुरु चेंगराचेंगरी प्रकरणाबाबत पहिल्यांदाच मोठं वक्तव्य

Virat Kohli Reaction on Bengaluru Stampede : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (आरसीबी) ने ३ जून २०२५ रोजी १७ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चे विजेतेपद प्रथमच पटकावले. अहमदाबाद येथे पंजाब किंग्सविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात आरसीबीने हा ऐतिहासिक विजय मिळवला. मात्र, हा आनंद अल्पकाळ टिकला. ४ जून रोजी बंगलुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर आयोजित विजयी मिरवणुकीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला, तर सुमारे ५० जण जखमी झाले. या दुर्घटनेने आरसीबीच्या विजयोत्सवाला गालबोट लागले.
विराट कोहली काय म्हणाला?
या हृदयद्रावक घटनेला तीन महिने उलटल्यानंतरही आरसीबीचा दिग्गज खेळाडू विराट कोहली याला या दु:खातून सावरणे कठीण झाले आहे. आरसीबीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर कोहलीचा एक भावनिक संदेश पोस्ट करण्यात आला आहे. त्यात तो म्हणाला, “आयुष्यात काहीही तुम्हाला ४ जूनसारख्या हृदयद्रावक घटनेसाठी तयार करत नाही. आमच्या फ्रँचायझीसाठी जो सर्वात आनंदाचा क्षण ठरायला हवा होता, तो एका शोकांतिकेत बदलला.”
मी त्या कुटुंबांबद्दल विचार करतोय –
“Nothing in life really prepares you for a heartbreak like June 4th. What should’ve been the happiest moment in our franchise’s history… turned into something tragic. I’ve been thinking of and praying for the families of those we lost… and for our fans who were injured. Your… pic.twitter.com/nsJrKDdKWB
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) September 3, 2025
विराट कोहली पुढे म्हणाला, “मी त्या कुटुंबांबद्दल विचार करतोय आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करतोय, ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आणि जखमी झालेल्या चाहत्यांसाठी. त्यांचे नुकसान आता आमच्या कहानीचा हिस्सा आहे. आपण एकत्रितपणे काळजी, सन्मान आणि जबाबदारीने पुढे जाऊ.”
हेही वाचा – Asia Cup 2025 : बांगलादेशबद्दलचा ‘तो’ निर्णय टीम इंडियाला महागात पडणार? कॅप्टन सूर्याचं वाढलं टेन्शन
या दुर्घटनेनंतर कोहलीने यापूर्वीही शोक व्यक्त केला होता. आरसीबीने या घटनेनंतर ‘आरसीबी केअर्स’ हा उपक्रम सुरू केला असून, मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. दरम्यान, या प्रकरणी कर्नाटक सरकारने जुलै महिन्यात आरसीबीविरुद्ध खटला चालवण्यास परवानगी दिली आहे.
हेही वाचा – Muhammad Waseem : UAE चा कर्णधार मोहम्मद वसीमने मोडला हिटमॅनचा ‘तो’ विक्रम; बनला जगातील नंबर 1 फलंदाज
कशी घडली दुर्घटना?
४ जून रोजी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर आयोजित विजयी मिरवणुकीसाठी प्रचंड संख्येने चाहते जमले होते. गर्दीच्या दबावामुळे व्यवस्थापनाला नियंत्रण ठेवणे कठीण झाले आणि चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला, तर ५० हून अधिक जण जखमी झाले. या घटनेने आरसीबीच्या विजयाचा आनंद दु:खात बदलला. कर्नाटक सरकारने या प्रकरणी तपास सुरू केला असून, जबाबदारी निश्चित करण्यासाठी पावले उचलली आहेत.





