RCB Announcement : आरसीबीची मोठी घोषणा! बंगळुरुतील चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबाना तब्बल ‘इतक्या’ लाखांची मदत जाहीर

नेमकं काय घडलं होतं?
रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबीने ३ जून २०२५ रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्सचा ६ धावांनी पराभव करून प्रथमच आयपीएल विजेतेपद पटकावले. या विजयानंतर दुसऱ्या दिवशी, ४ जून रोजी बंगलुरू येथे विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने चाहते एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर जमले होते. मात्र, स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे हा आनंदोत्सव शोकांतिकेत बदलला.
आरसीबीने निवेदनात काय म्हटलं?
𝗥𝗖𝗕 𝗖𝗮𝗿𝗲𝘀: 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗔𝗻𝗻𝗼𝘂𝗻𝗰𝗲𝗺𝗲𝗻𝘁
Our hearts broke on June 4, 2025.
We lost eleven members of the RCB family. They were part of us. Part of what makes our city, our community & our team unique. Their absence will echo in the memories of each one of… pic.twitter.com/1hALMHZ6os
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) August 30, 2025
आरसीबीने एक भावनिक निवेदन शेअर करताना म्हटले, “४ जून २०२५ रोजी आमची हृदये तुटली. आम्ही आमच्या आरसीबी परिवारातील ११ सदस्य गमावले. ते आमच्या शहराचा, समुदायाचा आणि आमच्या संघाचा अविभाज्य भाग होते. त्यांच्या अनुपस्थितीची पोकळी आमच्या स्मृतीत कायम राहील. या शोकांतिकेने निर्माण झालेली पोकळी कोणतीही मदत भरून काढू शकत नाही.”
हेही वाचा – Rahul Dravid Resigns : राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! राहुल द्रविडने दिला तडकाफडकी राजीनामा, नेमकं कारण काय?
प्रत्येक मृत व्यक्तीच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची मदत –
पुढे फ्रँचायझीने म्हटले, “तरीही, एक छोटी सुरुवात म्हणून आणि गहन आदर व्यक्त करण्यासाठी, आरसीबीने प्रत्येक मृत व्यक्तीच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. ही केवळ आर्थिक मदत नाही, तर करुणा, एकता आणि सातत्यपूर्ण काळजीचा संकल्प आहे. यासह ‘आरसीबी केअर्स’ या दीर्घकालीन सामाजिक उपक्रमाची सुरुवात होत आहे, जो चाहत्यांच्या भावना, अपेक्षा आणि इच्छांना सन्मान देण्यासाठी समर्पित असेल.”
हेही वाचा – Amir Jamal : ‘मला का वगळलं, स्पष्टीकरण द्या…’, आमिर जमालचा पीसीबी आणि निवड समितीवर हल्लाबोल
आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात आरसीबीने २० षटकांत ९ बाद १९० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्सला ७ बाद १८४ धावांपर्यंतच मजल मारता आली. क्रुणाल पंड्या आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करत आरसीबीच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या विजयाने आरसीबीने १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पहिले आयपीएल विजेतेपद पटकावले.





