Ben Stokes : ‘जर हे इतरत्र घडले असते, तर खूप गदारोळ झाला असता’; स्कोक्सने मेलबर्न पिचवर सुनावलं

दोन दिवसांत खेळ खल्लास!
दरवर्षीप्रमाणे मेलबर्नमध्ये ‘बॉक्सिंग डे’ कसोटीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, शुक्रवार २६ डिसेंबर रोजी सुरू झालेला हा सामना २७ डिसेंबरला, म्हणजेच अवघ्या दोन दिवसांत संपला. संपूर्ण सामन्यात केवळ १४२ षटकांचा खेळ झाला आणि तब्बल ३६ फलंदाज बाद झाले. दोन्ही डावांत कोणत्याही संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही, तसेच एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आले नाही. बॉक्सिंग डे कसोटीसाठी मैदानावर हजारो प्रेक्षक जमतात, अशा वेळी सामना इतक्या लवकर संपल्याने चाहत्यांचा हिरमोड झाला.
“दुसरीकडे असे घडले असते, तर मोठा गदारोळ झाला असता” – स्टोक्स
“If that was somewhere else in the world, you know, there’d be hell on”
The captains share their opinions on the spicy MCG pitch 👀 #Ashes pic.twitter.com/XwhX3mexIB
— cricket.com.au (@cricketcomau) December 27, 2025
विजयानंतर माध्यमांशी बोलताना बेन स्टोक्स म्हणाला, “हा विजय आमच्यासाठी महत्त्वाचा असला तरी, कसोटी सामना दोन दिवसांत संपणे हे क्रिकेटसाठी आदर्श नाही. प्रामाणिकपणे सांगायचे तर, कोणालाही असे सामने आवडणार नाहीत.”
हेही वाचा – Year Ender 2025 : गुकेश-दिव्यापासून शीतल-सुमितपर्यंत: २०२५ मध्ये भारताच्या ‘या’ खेळाडूंची जागतिक धूम!
स्टोक्सने यावेळी आशियाई देशांमधील (विशेषतः भारत) फिरकी खेळपट्ट्यांवरून होणाऱ्या वादाचा अप्रत्यक्ष संदर्भ देत ऑस्ट्रेलियावर निशाणा साधला. तो पुढे परखड मत मांडताना म्हणाला, “मला खात्री आहे की, जगातील इतर कोणत्याही भागात असा सामना झाला असता, तर आतापर्यंत मोठा गदारोळ माजला असता. जो सामना पाच दिवस चालायला हवा, तो दोन दिवसांत संपणे खेळाच्या दृष्टीने चांगले नाही.”
इतिहासातील चौथा सर्वात छोटा सामना –
मेलबर्न कसोटी अवघ्या ८५२ चेंडूंमध्ये निकाली निघाली, जो अॅशेसच्या इतिहासातील चौथा सर्वात छोटा सामना ठरला. विशेष म्हणजे, या मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे खेळला गेला होता, तोही ८४७ चेंडूंमध्ये (दोन दिवसांत) संपला होता. पर्थच्या खेळपट्टीला आयसीसीने ‘चांगली’ रेटिंग दिली होती, मात्र आता मेलबर्नच्या खेळपट्टीबाबत आयसीसी काय निर्णय घेणार, याकडे क्रीडा विश्वाचे लक्ष लागले आहे.





