मते मिळाल्यानंतर लाडक्या बहिणींची फसवणूक; विजय वडेट्टीवारांची टीका

नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या आधी लाडक्या बहिणींना अँडव्हान्स मध्ये पैसे देण्यात आले, सरकार आल्यावर आता मात्र लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी कमी केले जात आहेत. गरज सरो आणि वैद्य मरो अशी फसवणूक महायुती सरकारने केल्याची टीका विधी मंडळ काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
नागपूर मध्ये पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले , सरकारच्या तिजोरीत खडखडाट असताना मत विकत घेण्यासाठी सरसकट महिलांना पैसे देण्यात आले, आता सरकार आल्यावर मात्र विविध अटी लावून लाभार्थी महिलांची संख्या कमी केली जात आहे.
लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या ही २५ टक्के पर्यंत आणणार, असे महापाप सरकार करत आहे. या सरकारला या बहिणीच जागा दाखवू शकतात अशी टीका वडेट्टीवारांनी केली. एकनाथ शिंदे यांनी जे निर्णय घेतले त्याची चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहे. हे महायुती मधील मतभेद आहेत.
महायुती सरकारचा कारभार स्वच्छ असणार असा नारा मुख्यमंत्र्यांनी दिला, त्याची सुरुवात एकनाथ शिंदे यांच्या निर्णया पासून झाली आहे. महायुती सरकारमध्ये कुरघोडीचे राजकारण जोरात सुरू आहे, जनतेला मात्र वाऱ्यावर सोडले अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.





