Pune: नाशिकमध्ये अनेक महिलांचे शोषण करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात याच्यावर नाशिक पोलिसांनी तत्पर कारवाई करत अटक केली आहे. वेळेत कारवाई झाली नसती, तर तो परदेशात पळून जाण्याची शक्यता होती, अशी माहिती समोर आली आहे. या कारवाईबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेच्या वतीने कौतुक करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते यांनी याबाबत अभिनंदन व्यक्त केले. पुण्यातील पोलीस मित्र संघटनेच्या मुख्य कार्यालयात यासंदर्भात अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, अशोक खरातसारखे अनेक भोंदू बाबा समाजात सक्रिय असून त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी अध्यक्ष राजेंद्र कपोते यांनी केली आहे.