Sinhagad Bee Attack – किल्ले सिंहगडावर रविवारी दुपारी काही पर्यटकांच्या हुल्लडबाजीमुळे चिडलेल्या मधमाशांनी अचानक हल्ला झाल्याची घटना घडली. गडावरील तटबंदीवरून खाली दगड फेकण्याची चढाओढ सुरू असताना परिसरातील मधमाशांच्या पोळ्यांना ते लागले. त्यामुळे चिडलेल्या मधमाशांनी पर्यटकांवर जोरदार हल्ला चढवला. या घटनेत सुमारे पाच ते सहा पर्यटक जखमी झाले असून, त्यात दीड वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी (दि. ८ मार्च) दुपारी सुमारे साडेतीन वाजण्याच्या सुमारास काही तरुण पर्यटक तटबंदीवरून खाली दगड फेकण्याची स्पर्धा करत होते. दगड लागल्याने येथील मधमाशा चिडल्या आणि त्यांनी या पर्यटकांवर हल्ला केला. यामुळे गडावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे सुरक्षा रक्षक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकानेही गडावर धाव घेत रुग्णवाहिका बोलावली. आपत्ती व्यवस्थापन पथक आणि वनव्यवस्थापन समितीच्या कर्मचाऱ्यांनी जखमी पर्यटकांना गडावरून खाली आणून उपचारासाठी पाठवले. दरम्यान, पुरातत्व विभागाच्या नियंत्रणाखाली गडावर नेमणूक असलेल्या चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट (पिंपळे गुरव) येथील सुमीत रांजणे, दत्ता जोरकर, स्वप्नील सांबरे, राहुल जोरकर तसेच इंद्राणी बालन फाउंडेशनचे हर्षद गायकवाड, दीपक जोरकर आणि श्रीकांत लांघी या स्थानिक पहारेकऱ्यांनी विविध ठिकाणी धूर करून मधमाशांना हाकलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिस्थिती त्वरित नियंत्रणात आली. या घटनेत युवांश ऋषिकेश सोनार (दीड वर्षे) या बालकासह त्याचे वडील ऋषिकेश, आई निधी ऋषिकेश सोनार तसेच कविता प्रसाद सोनार आणि अंश प्रसाद सोनार यांना मधमाशांनी चावा घेतला. त्यांना सुरक्षितपणे गडावरून खाली आणून खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याशिवाय नंदकुमार शिदू घारघे (वय ६४, रा. भोसरी) हे गंभीर जखमी झाले. त्यांना प्रथम खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार देण्यात आले, त्यानंतर त्यांना खडकवासला येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून वन विभागाने काही काळ सिंहगड पर्यटकांसाठी प्रवेश बंद केला होता. तसेच गोळेवाडी आणि घाटातील कोंढणपूर फाटा येथील टोलनाकेही तात्पुरते बंद करण्यात आले. मधमाशांचा उपद्रव कमी झाल्यानंतर गडावरील पर्यटकांना टप्प्याटप्प्याने खाली उतरवण्यात आले.