Pune District: किल्ले शिवनेरीवर मधमाशांचा हल्ला

लेण्याद्री : किल्ले शिवनेरीवर आलेल्या शिवभक्तांवर रविवारी (दि. 16) सकाळी मधमाशांनी हल्ला केला. या घटनेत सुमारे 55 नागरिक जखमी झाले असून यात महिला आणि मुलांचाही समावेश आहे. सर्व जखमींना जुन्नर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले.
रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे नेहमीपेक्षा गर्दी जास्त होती. सुमारे 8.30 च्या सुमारास आगेमोहोळावरील माश्या उडाल्या आणि त्यांनी गडावरील नागरिकांना चावा घेण्यास सुरुवात केली. शिवजन्मस्थळ आणि शिवाई देवी मंदिर या दोन्ही परिसरातील मोहोळ उठले होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. त्यानंतर पळापळ सुरू झाली. यामध्ये शालेय विद्यार्थी, महिला तसेच मोठ्या संख्येने युवक गडावर होते. त्यांनी पळतच पायथा गाठला, तर काहींनी गडावरच सुरक्षित आश्रय शोधला.
सुमारे 6-7 रुग्णवाहिकांद्वारे जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण, वनरक्षक रमेश खरमाळे व इतर कर्मचारी, जुन्नर रेस्क्यू टीमचे संतोष कबाडी, राजकुमार चव्हाण व सोबती तसेच शिवाई देवी माता मंदिरातील पुजारी सोपान दुराफे आदींनी मदतकार्य केले.
दरम्यान सर्वत्र उन्हाच्या झळा वाढत असून अशा घटना वारंवार घडत आहेत. 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव सभा झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टरने प्रस्थान केले होते. त्यानंतर काही वेळातच आग्या मोहोळाच्या मधमाशा चावल्याने अनेक शिवभक्त जखमी झाले होते.
उपद्रवी युवकांचा बदोबस्त करणार कोण?
ही दुर्घटना काही उपद्रवी युवकांनी मोहोळावर दगड फेकून मारल्यामुळे झाल्याचे अनेकांनी सांगितले आहे. मागे घडलेल्या अनेक घटकांमध्ये अशीच मानवनिर्मित कारणे असल्याचे उघड झाले होते. तर मोहोळ असलेल्या परिसरात जाताना कोणत्याही प्रकारची सुगंधी अत्तरे (सेंट), स्पीकर किंवा इतर मोठे आवाज तसेच सिगारेट किंवा इतर कोणताही धूर करू नये, असे आवाहन वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी केले आहे.





