दिल्लीच्या विमानावर मधमाशांचा हल्ला; विमानसेवा काहीकाळ विस्कळीत

मुंबई : येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानावर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली. यामुळे काही काळासाठी विमानसेवा विस्कळीत झाली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. विमानतळावरील क्विक रिस्पॉन्स पथकाने तातडीने कारवाई करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अकसा एअरचे मुंबई येथून राजधानी दिल्लीला जाणारे विमान बे नंबर ए1 वर थांबले होते. यावेळी मधमाशांच्या थव्याने या विमानाला संपूर्ण वेढले. त्यामुळे प्रवाशांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच विमानतळावरील पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या क्विक रिस्पॉन्स टीमने सुरक्षितपणे योग्य पर्यावरणपुरक पद्धतींचा वापर करत मधमाशांना विमानापासून दूर केले. क्विक रिस्पॉन्स टीमच्या टीमने केलेल्या या कामामुळे मोठा अनर्थ टळला.
या घटनेमुळे मुंबई विमानतळावरील विमानाचे वेळापत्रक काही काळासाठी विस्कळीत झाले होते. यानंतर विमानतळ प्रशासनाने आवश्यक तपासण्या केल्या. या तपासणीनंतर विमानाला दिल्लीकडे रवाना करण्याची परवानगी देखील देण्यात आली. विशेष म्हणजे या घटनेत कोणीही जखमी झाले नाही, अशी माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, या घटनेची विमानतळ प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे.





