Beed sarpanch – जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महिन्याभरात पुन्हा एकदा बीड जिल्हा हादरला आहे. राखेची अवैध वाहतूक करणा-या टिप्परने त्यांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अभिमन्यू क्षीरसागर असे मृत्यू झालेल्या सरपंचाचे नाव आहे. ते सौंदना गावचे सरपंच होते. मिरवट फाट्यावर हा भीषण अपघात झाला. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून हा अपघात की घात आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, शनिवारी रात्री सरपंच अभिमन्यू क्षीरसागर हे आपल्या दुचाकीवरून जात असताना मिरवट फाट्यावर राखेची वाहतूक करणा-या टिप्परने त्यांना जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला. यात त्यांच्या डोक्याला भीषण दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या अपघातानंतर डंपरचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाचा तपास सुरू असताना महिनाभरात दुस-या एका सरपंचाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पुढील तपास बीड पोलीस करीत आहेत. राखेचा टिप्पर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. “हा घातपात होता का? याची चौकशी झाली पाहीजे” – सुरेश धस परळीतील औष्णिक विद्युत प्रकल्पातून निघणाऱ्या राखेची अवैध वाहतूक आणि व्यवसाय होत आहेत. याच राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने धडक दिल्याने सरपंच क्षीरसागर यांचा जागेवरच मृत्यू झाला. हा घातपात होता का? याची चौकशी झाली पाहीजे. संतोष देशमुख प्रकरण झाल्यानंतरही अवैध राखेची वाहतूक करणारे टिप्पर बंद झालेले नाहीत. याला परळी पोलीस, औष्णिक विद्युत प्रकल्पाचे अधिकारी जबाबदार आहेत.