काळजी घ्या ! एप्रिल ते जूनदरम्यान उष्णतेची लाट येणार.. आयएमडीने व्यक्त केला अंदाज

पुणे – एप्रिल ते जूनदरम्यान देशात उष्णतेची लाट येणार असून, त्याचा परिणाम दीर्घकाळ असणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) व्यक्त केला आहे. या महिन्याच्या अखेरीस आणि संपूर्ण उन्हाळ्यात शहराचे तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे.
एप्रिल ते जून या कालावधीत मध्य, पूर्व आणि वायव्य भारतातील बहुतांश भागात उष्णतेच्या लाटेच्या अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या अंदाजामध्ये महाराष्ट्रातील बहुतांश भागही होरपळून निघणार आहे. यामध्ये पुण्याचाही समावेश असण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाळ्यात तापमान दर उन्हाळ्याप्रमाणे सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसह जवळपास निम्म्या राज्याला उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवेल. पुण्यातही उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवणार असून, त्यामुळे नागरिकांना अतिउष्णतेचा त्रास सहन करावा लागणार असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.
शहरातील कमाल तापमान वाढत आहे आणि पुढील 72 तासांपर्यंत ते वाढतच राहील. पण उष्णतेच्या लाटेच्या तुलनेत ती तितकी तीव्र नसेल. पुणे शहरावर उष्णतेच्या लाटेचा तात्काळ परिणाम होणार नाही.असं मत आयएमडी विभाग प्रमुख अनूपम कश्यपी यांनी व्यक्त केले.
एप्रिल 2023 मध्ये जो अवकाळी पाऊस येतो त्याचा अंदाजही हवामान विभागाने जारी केला असून, त्यामध्ये संपूर्ण देशात या कालावधीत सामान्य पाऊस (88-112%) होण्याची शक्यता आहे. बहुतेक वायव्य, मध्य आणि द्वीपकल्पांमध्ये सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे. तर पूर्व आणि ईशान्य भारत तसेच भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील काही भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे.





