Pune District : सावध रहा, सुरक्षित राहा

बँक व्यवहारात सतर्कता ठेवा – जुन्नरचे पोलीस निरीक्षक अवचर
जुन्नर – ज्येष्ठ नागरिकांनी बँक, एटीएममध्ये पैशांचे व्यवहार करताना तेथे कोणत्याही अनोळखीची मदत घेऊ नये. आपल्या मागे अनोळखी उभा असल्यास एटीएमचे व्यवहार त्याच्या देखत करू नयेत. तसेच आपला पिन, ओटीपी नंबर कोणालाही देऊ नये. घरात एकटे असताना ज्येष्ठ नागरिकांनी अनोळखी ना घरात घेऊ नये. ज्येष्ठ नागरिकांना कोणतीही अडचण आल्यास मदत लागल्यास त्यांनी तातडीने पोलिसांच्या 112 क्रमांकावर संपर्क साधून मदत मागावी, असे आवाहन जुन्नरचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी केले.
ज्येष्ठ नागरिक संघ जुन्नरच्या पदाधिकारी व सदस्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी प्राचार्य महादेव वाघमारे, सुधीर ढोबळे, संघाचे अध्यक्ष अनिल जोगळेकर, गोविंद हिंगे, श्रीकांत देशपांडे, रत्नाकर आवटे, सुधाकर वाडकर, अजित परदेशी, देविदास काजळे, अलका जुन्नरकर, जोत्स्ना देशपांडे, पद्मिनी हराळ आदींसह संघाचे सभासद यावेळी उपस्थित होते.
किरण अवचर म्हणाले सेवा निवृत्त आणि ज्येष्ठ नागरिक यांची फसवणूक करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. दागिने पॉलिश करून देतो, भविष्य सांगतो, आजारांवर औषधउपचार करतो असे सांगून अनोळखी घरात येऊन चलाखीने हात सफाई करतात तसेच पैशांची फसवणूक करतात. ज्येष्ठ नागरिकांनी बँक व्यवहार तसेच एटीएम वापरताना सतर्क राहिले पाहिजे. एटीएममध्ये अनोळखीशी बोलू नये. तसेच त्याला आपल्या एटीएमबाबत माहिती देऊ नये. तसेच त्याच्याकडे एटीएमकार्ड देऊ नये.
अनोळखी गोड बोलून तुम्हाला काही मदत करीत असेल तर अशा वेळी सावध होऊन आरडाओरडा केला पाहिजे. चौकात तपासणी सुरू आहे आम्हाला दानधर्म करायचा आहे, तुमचे दागिने आमच्या पैशाला लावा, असे कारणे सांगून ज्येष्ठ नागरिक महिलांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढलेले असून याकरिता महिलांनी अनोळखीशी बोलू नये तो काही सांगत असेल तर ते न ऐकता आरडाओरडा करून मदत मागितली पाहिजे.
अनोळखी ना आपल्या घरात प्रवेश देऊ नये तसेच आपले बँक खाते माहिती, एटीएम, ओटीपी, पिननंबरची माहिती कुणी मागितली तरी देऊ नये. कोणत्याही ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक होत असेल कुणी त्रास देत असेल, ओळख नसतानाही बोलत असेल अशा वेळी ज्येष्ठ नागरिकांनी सावधगिरी बाळगून पोलिसांच्या 112 या क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी. व मदत मागावी असे आवाहन अवचर यांनी यावेळी केले.





