काळजी घ्या..! ‘या’ शहरात आढळले ‘GBS’चे 3 रुग्ण; रुग्णालयात उपचार सुरू !

छत्रपती संभाजीनगर – पुण्यासह राज्यभरात गुईलेन बॅरी सिंड्रोमच्या (जीबीएस) रुग्णांत वाढ होत आहे. त्यात आता छत्रपती संभाजीनगरचीही भर पडली आहे. येथील घाटी रुग्णालयात सध्या जीबीएसचे 3 नवे रुग्ण आढळले असून, यात एका 10 वर्षीय स्थानिक मुलीचा समावेश आहे.
विशेष म्हणजे जीबीएस हा काही नवा आजार नाही. या आजाराचे तब्बल 90 रुग्ण गतवर्षी म्हणजे 2024 मध्ये घाटी रुग्णालयात दाखल होते. त्यामुळे या प्रकरणी काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
यासंबंधीच्या माहितीनुसार, घाटीच्या मेडिसीन विभागात गत 21 जानेवारी भुसावळ येथील एक 35 वर्षीय महिला उपचारासाठी दाखल झाली होती. त्यानंतर 27 जानेवारी रोजी हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील दुसरी एक 35 वर्षीय महिला दाखल झाली.
या दोन्ही महिलांमध्ये पॅरालिसिसीससारखी लक्षणे आढळली. याशिवाय छत्रपती संभाजीनगर येथील एका 10 वर्षीय मुलीवरही 25 जानेवारीपासून घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या तिघींनाही जीबीएसची लागण झाली आहे.





