BCCI Two Teams Plan : बीसीसीआयचा ३५ खेळाडूंचा मेगा प्लॅन! ‘एकाच वेळी दोन टीम’ खेळणार; श्रेयस अय्यर असणारा टीम इंडियाचा सरपंच
BCCI Two Teams Plan : वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा आणि वेस्ट इंडिजविरुद्धची टी-२० मालिका एकाच वेळी पार पडणार असल्याने, मंडळाने ३० ते ३५ खेळाडूंचा एक तगडा 'पूल' तयार केला आहे.

BCCI Two Simultaneous Teams Plan : भारतीय क्रिकेट आता एका ऐतिहासिक बदलाच्या उंबरठ्यावर उभे आहे. वाढत्या आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या पार्श्वभूमीवर, बीसीसीआयने एकाच वेळी दोन वेगवेगळे संघ मैदानात उतरवण्याची मोठी तयारी केली आहे. वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा आणि वेस्ट इंडिजविरुद्धची टी-२० मालिका एकाच वेळी पार पडणार असल्याने, मंडळाने ३० ते ३५ खेळाडूंचा एक तगडा ‘पूल’ तयार केला आहे.
व्यस्त क्रिकेट कॅलेंडर आणि महत्त्वाच्या स्पर्धांचा ताळमेळ बसवण्यासाठी बीसीसीआयने आता ‘बेंच स्ट्रेंथ’लाच मुख्य ताकद बनवण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच अर्थ, टीम इंडिया आता एकाच वेळी दोन वेगवेगळ्या देशांविरुद्ध टी-२० सामने खेळताना दिसू शकते. या रणनीतीची पहिली चाचणी आगामी आयर्लंड दौऱ्यावर होण्याची शक्यता आहे.
आयपीएल २०२६ चे स्टार्स रडारवर –
आयपीएल २०२६ मध्ये आपल्या बॅटने आणि बॉलने धमाका करणाऱ्या अनेक युवा खेळाडूंवर निवडकर्त्यांची नजर आहे. फलंदाजीमध्ये वैभव सूर्यवंशी, यशस्वी जैस्वाल, प्रियांश आर्य आणि अंगकृष रघुवंशी यांसारख्या स्फोटक फलंदाजांना प्राधान्य दिले जाऊ शकते. तसेच रजत पाटीदार आणि आयुष बडोनी यांच्या नावांचीही चर्चा आहे. यष्टीरक्षणासाठी ध्रुव जुरेल हा प्रबळ दावेदार असून, या नव्या दमाच्या संघाची धुरा श्रेयस अय्यर याच्याकडे सोपवली जाऊ शकते.
अष्टपैलू आणि गोलंदाजीची भक्कम फळी –
संघाचा समतोल राखण्यासाठी शशांक सिंग आणि अनुकूल रॉय यांसारख्या अष्टपैलू खेळाडूंना संधी मिळू शकते. गोलंदाजीमध्ये फिरकीपटू रवी बिश्नोईसह खलील अहमद, प्रसिध कृष्णा आणि कार्तिक त्यागी यांसारख्या वेगवान गोलंदाजांची फळी तयार केली जात आहे. बीसीसीआयचा हा निर्णय केवळ आशियाई क्रीडा स्पर्धांपुरता मर्यादित नसून, भविष्यात प्रमुख खेळाडूंना विश्रांती देऊनही भारताची ताकद कमी होऊ नये, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. लवकरच भारत एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशांविरुद्ध विजयाचा झेंडा फडकवताना दिसला तर नवल वाटायला नको.





