BCCI : बीसीसीआयने जर्सी प्रायोजकासाठी ठरवली आधारभूत किंमत, बोर्डाला प्रति सामन्यास ‘इतके’ कोटी मिळण्याची अपेक्षा

नव्या प्रायोजकाकडून बीसीसीआयला द्विपक्षीय मालिकेतील प्रत्येक सामन्यासाठी किमान ३.५ कोटी रुपये मिळतील, तर आयसीसी आणि एसीसी स्पर्धांसाठी किमान १.५ कोटी रुपये प्रति सामना मिळतील. यापूर्वी ड्रीम११ कडून द्विपक्षीय सामन्यांसाठी ३.१७ कोटी रुपये आणि बहुराष्ट्रीय स्पर्धांच्या सामन्यांसाठी १.१२ कोटी रुपये मिळत होते. यानुसार, द्विपक्षीय सामन्यांसाठी १० टक्के आणि बहुराष्ट्रीय स्पर्धांसाठी सुमारे ३ टक्के किंमतीत वाढ झाली आहे.किंमती वेगवेगळ्या ठेवण्याचे कारण काय?
द्विपक्षीय सामने आणि बहुराष्ट्रीय स्पर्धांमधील सामन्यांसाठी आधारभूत किंमती वेगवेगळ्या ठेवण्याचे कारण म्हणजे, द्विपक्षीय सामन्यांमध्ये प्रायोजकाचा लोगो जर्सीच्या समोरच्या बाजूस असतो, ज्यामुळे ब्रँडला अधिक प्रसिद्धी मिळते. याउलट, विश्वचषक आणि आशिया चषकासारख्या स्पर्धांमध्ये प्रायोजकाचा लोगो जर्सीच्या बाहूवर असतो, ज्यामुळे ब्रँडची दृश्यमानता कमी होते. क्रिकबझच्या अहवालानुसार, बीसीसीआयला पुढील तीन वर्षांसाठी प्रायोजक हवा आहे, ज्यामध्ये टी-२० विश्वचषक आणि २०२७ मधील एकदिवसीय विश्वचषकाचा समावेश आहे.
भारतीय संघ २०२७ पर्यंत सुमारे १३० सामने खेळणार आहे. यानुसार, नव्या प्रायोजकाकडून बीसीसीआयला ४०० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा करार मिळू शकतो. अंतिम रक्कम यापेक्षा जास्तही असू शकते. १६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बोली प्रक्रियेनंतर कोणत्या कंपनीने किती किंमतीत प्रायोजकत्वाचे हक्क मिळवले हे स्पष्ट होईल. मात्र, आशिया चषक २०२५ पर्यंत भारतीय संघाला नवीन प्रायोजक मिळणार नाही आणि तात्पुरत्या स्वरूपातही कोणतीही व्यवस्था केली जात नाही.
हेही वाचा – शिखर धवन अडकला EDच्या कचाट्यात; काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या…
बीसीसीआयने प्रायोजकासाठी काय ठेवलीय अट?
मंगळवारी, २ सप्टेंबर रोजी बीसीसीआयने भारतीय संघाच्या प्रमुख प्रायोजकत्व हक्कांसाठी रुचीपत्र जारी केले. यात गेमिंग, सट्टेबाजी, क्रिप्टो आणि तंबाखू ब्रँडना बोली लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच, ॲथलेझर आणि स्पोर्ट्सवेअर उत्पादक, बँकिंग, वित्तीय कंपन्या, गैर-अल्कोहलिक शीतपेय, पंखे, मिक्सर ग्राइंडर, सेफ्टी लॉक आणि विमा कंपन्यांना देखील पात्र ठरवले जाणार नाही, कारण त्यांचा बीसीसीआयच्या विद्यमान प्रायोजकांशी संभाव्य संघर्ष होऊ शकतो.





