BCCI : भारतीय दृष्टीहीन महिला संघाचा BCCIकडून सत्कार! सचिव देवजित सैकिया यांनी केली मोठी घोषणा

BCCI honours Indian blind women’s cricket team : भारतीय दृष्टीहीन महिला क्रिकेट संघाने २३ नोव्हेंबर रोजी पहिला-वहिला टी-२० विश्वचषक जिंकून इतिहास रचला. कर्णधार दीपिका टीसीच्या नेतृत्वाखालील भारताने अंतिम सामन्यात नेपाळचा ७ गडी राखून दणदणीत पराभव केला होता. या देदिप्यमान यशानंतर सुमारे एक महिन्यानंतर १९ डिसेंबर रोजी भारतीय संघाचे बीसीसीआय (BCCI) मुख्यालयात आगमन झाले, जिथे बोर्डाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंचा यथोचित गौरव केला.
बीसीसीआयकडून कौतुकाचा वर्षाव –
बीसीसीआयचे कोषाध्यक्ष रघुराम भट्ट यांनी मुख्यालयात खेळाडूंची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी संघाच्या मानसिक धैर्याचे आणि जिद्दीचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सचिव देवाजीत सैकिया यांनी या कार्यक्रमाला ‘वर्च्युअली’ संबोधित केले. त्यांनी दृष्टीहीन महिला क्रिकेटला बीसीसीआयचा पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर करत, भविष्यातील दौऱ्यांसाठी किट आणि प्रवासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
The Indian Blind Women’s Cricket Team who recently won the inaugural Women’s T20 World Cup for the Blind, visited the BCCI Headquarters today and interacted with the BCCI Hon Treasurer Mr Raghuram Bhat.
The BCCI would like to congratulate the entire team and the support staff… pic.twitter.com/g7gU66GbMh
— BCCI (@BCCI) December 19, 2025
बीसीसीआय अध्यक्ष मिथुन मन्हास यांनी या विजयाला ‘राष्ट्रीय अभिमानाचा स्रोत’ असल्याचे म्हटले, तर उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ही कामगिरी लाखो लोकांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
हेही वाचा – Blind Women T20 World Cup : भारतीय दृष्टीहीन महिला संघाने पटकावला पहिला-वहिला टी-२० विश्वचषक
विश्वचषकातील ‘अजेय’ प्रवास –
भारतीय संघाचा या स्पर्धेतील प्रवास अत्यंत प्रभावी राहिला.
- सुरुवात: श्रीलंकेवर मात करून भारताने आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली.
- साखळी फेरी: ऑस्ट्रेलियाविरुद्ध २९३ धावांचे कठीण लक्ष्य ठेवून ५७ धावांनी विजय मिळवला, तर पाकिस्तानला अवघ्या १०.२ षटकांत धूळ चारली.
- उपांत्य फेरी: ऑस्ट्रेलियाला ९ गड्यांनी नमवत भारताने दिमाखात फायनलमध्ये धडक मारली.
- अंतिम सामना: नेपाळने दिलेले ११५ धावांचे आव्हान भारताने अवघ्या १२.१ षटकांत ७ गडी राखून पूर्ण केले आणि जेतेपदावर नाव कोरले.
हेही वाचा – PM Modi : ब्लाइंड वर्ल्डकप विजेत्या महिला संघाचा पंतप्रधान मोदींकडून खास सन्मान! पाहा VIDEO
मान्यवरांकडून शुभेच्छा –
या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाचे विशेष कौतुक केले. खेळाडूंनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेतली, तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही खेळाडूंची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. कर्णधार दीपिका टीसी यावेळी म्हणाल्या, “आमच्या संघाने प्रचंड मेहनत घेतली आहे. आम्ही आता पुरुषांच्या संघासोबतही खेळण्यासाठी सज्ज आहोत.” या विजयाने भारतीय महिला क्रिकेटमध्ये एका नवीन युगाची सुरुवात केली असून संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे.





