Batenge Toh Katenge : भाजपच्या ‘बटेंगे तो कटेंगे’वर होणार कारवाई? निवडणूक आयोगाने मागवला अहवाल

Yogi Adityanath | Batenge Toh Katenge | Maharashtra : यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणा महाराष्ट्राच्या निवडणुकीत देखील चर्चेचा विषय ठरल्या होत्या. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपच्या प्रमुख नेत्यांकडून ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक है तो सेफ है’ या घोषणांचा वारंवार उल्लेख केल्याचं पाहायला मिळालं.
या घोषणेवरून महायुती आणि भाजपमधील मतभेदही चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. तसेच, इतर पक्षातील नेत्यांनी देखील यावर भाष्य केल्याचं दिसून आलं. सोशल मीडियावर सुद्धा ‘बटेंगे तो कटेंगे’ असे अनेक व्हिडिओ आणि पोस्टर व्हायरल झाले आहेत.
मात्र आता राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचारासाठी वापरण्यात आलेल्या वादग्रस्त विधानांवर निवडणूक आयोग कारवाई करण्याची शक्यता आहे. नुकतंच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांनी एक अहवाल मागवला आहे.
यात महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान वापरण्यात आलेले वादग्रस्त विधानांचा अहवालांचा समावेश आला आहे. बटँगे तो कटेंगे तसेच एखाद्याला धमकी देणे, सामाजिक किंवा धार्मिक भावना भडकवणाऱ्या विधानांचाही अहवाल निवडणूक आयोगाने मागवला आहे.
येत्या 15 दिवसात हा अहवाल द्यावा, अशा सूचना राज्यातील निवडणूक अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. त्यामुळे आता ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेवर कारवाई होण्याची शक्यता दिसून येत आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी 20 नोव्हेंबरला मतदान पार पडले. आता उद्या शनिवारी (दि. 23) या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे.





