Baramati : बारामती गणेश फेस्टिवलच्या श्री गणेशाचे साधेपणाने विसर्जन; अजितदादांच्या निधनामुळे यंदा उत्सवाला विराम
Baramati : बारामती गणेश फेस्टिवलचे आयोजन नटराज नाट्य कला मंडळाच्या वतीने गेली २५ वर्षे अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

बारामती : बारामतीच्या सांस्कृतिक क्षेत्रात गेली २५ वर्षे आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या बारामती गणेश फेस्टिवलच्या श्री गणेशाचे विसर्जन यंदा अत्यंत साध्या पद्धतीने तिरंगा सर्कल येथील कृत्रिम कुंडामध्ये करण्यात आले.
फेस्टिवलचे संस्थापक अजितदादा पवार यांच्या निधनामुळे यंदाचा संपूर्ण गणेश फेस्टिवल रद्द करण्यात आला होता. त्यामुळे दरवर्षी पालखीतून निघणारी श्री गणेशाची विसर्जन मिरवणूकही यंदा काढण्यात आली नाही.
बारामती गणेश फेस्टिवलचे आयोजन नटराज नाट्य कला मंडळाच्या वतीने गेली २५ वर्षे अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि मनोरंजनपर उपक्रमांच्या माध्यमातून या फेस्टिवलने गेल्या अडीच दशकांत बारामतीच्या गणेशोत्सवाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे.
यंदाचे वर्ष हे बारामती गणेश फेस्टिवलचे २५ वे वर्ष होते. गेल्या वर्षी फेस्टिवलच्या उद्घाटनप्रसंगी अजितदादांनी, “पुढील वर्ष हे फेस्टिवलचे २५ वे वर्ष असल्याने ते मोठ्या प्रमाणात साजरे करूया,” अशी इच्छा व्यक्त केली होती.
मात्र यंदा दादाच आपल्यात नसल्याने त्यांच्या निधनानंतर बारामती गणेश फेस्टिवलने सर्वप्रथम यंदाचा फेस्टिवल आयोजित न करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार यावर्षी कोणत्याही सांस्कृतिक अथवा मनोरंजनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले नाही.
यंदा केवळ श्री गणेशाची प्रतिष्ठापना करून दररोज सकाळ-संध्याकाळ नियमित आरती करण्यात आली. प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या दिवशी बारामतीतील विविध महिला मंडळांच्या वतीने अथर्वशीर्ष पठण करून ते श्री गणेशाच्या चरणी अर्पण करण्यात आले.
गेल्या २५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच तिरंगा सर्कल येथील बारामती गणेश फेस्टिवलच्या ठिकाणी ना भव्य मंडप, ना आकर्षक रोषणाई, ना सजावट आणि ना विविध सांस्कृतिक कार्यक्रम असे चित्र पाहायला मिळाले. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात विविध कार्यक्रम आणि नागरिकांच्या गर्दीने गजबजून जाणारा हा परिसर यंदा शांत होता.
अजितदादा पवार आणि बारामती गणेश फेस्टिवलचे गेल्या २५ वर्षांपासून अतूट नाते राहिले आहे. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत यंदा उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरवर्षी बारामतीच्या गणेशोत्सवाला एक वेगळे उत्सवी वातावरण देणाऱ्या या फेस्टिवलची उणीव यंदा बारामतीकरांना प्रकर्षाने जाणवली.
२५ वर्षांच्या वाटचालीत प्रथमच उत्सवाला विराम मिळाला असला, तरी अजितदादांनी बारामती गणेश फेस्टिवलला दिलेली ओळख आणि त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी कायम जपल्या जातील, अशी माहिती नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर यांनी दिली.





